मेघे गटाचा शिक्का बसल्याने जिल्ह्य़ात स्वतंत्र गट असणाऱ्या प्रमोद शेंडे गटाचे अस्तित्वच संपुष्टात येत असल्याची उपरती झाल्यावर या गटाचे वारसदार शेखर शेंडे यांनी अखेर स्वतंत्रपणे श्वास घेण्याचा पवित्रा घेतला आहे.
गेल्या विधानसभा निवडणुकीत अपक्ष उमेदवार प्रा. सुरेश देशमुख यांच्याकडून काँग्रेसची उमेदवारी मिळालेले शेखर शेंडे पराभूत झाले, तेव्हापासूनच शेंडे गटाला घरघर लागणे सुरू झाले. दिग्गज नेते प्रमोद शेंडे हे प्रकृती अस्वास्थ्यामुळे राजकारणातून बाजूला झाले. गटाची सूत्रे त्यांचे पुत्र शेखर शेडेंनी स्वत:कडे खेचली. पर्यायाने या गटाची दारोमदार शेखर शेंडेवर होती. गटाचे नेतृत्व करताना त्यांना प्रथमच राजकारणाचे खाचखळगे कळू लागले. घरात ३५ वर्षे सत्ता असताना केवळ व्यावसायिकदृष्टय़ा भक्कम होण्याची भूमिका ठेवणाऱ्या शेखर शेंडेंना राजकारणात माणसे जोडणे किती कठीण असते हे लगेचच उमगले.
वडील प्रमोददादा बाजूला झाले अन् शेखरपासूनही एक एक सहकारी बाजूला होत गेले. वर्धा-सेलू-सिंदी या पट्टय़ातील काँग्रेस व तेली समाजाचा गड निरंकुशपणे प्रमोद शेंडेंनी सांभाळला. मात्र त्यांच्या अनुपस्थितीत गट राखणे हे दिव्यच होते. याच पाश्र्वभूमीवर एकाकी पडणाऱ्या शेखर शेंडेंनी खासदार दत्ता मेघेंचा हात पकडला. प्रमोद शेंडेंना मानणाऱ्या खासदार मेघेंनीही या गटाला सांभाळून घेण्याचीच भूमिका ठेवली. शेंडे कुटुंबातील शेंडेफ ळ मेघेंमुळेच नगराध्यक्षपदी विराजमान झाले. मेघे-शेंडे गटाचे सामंजस्य राहले, पण मेघेंच्या वटवृक्षाच्या सावलीत शेंडे गटाचे स्वतंत्र वलय हरपू लागले. मेघेंचे सहकारी शेखर शेंडेंना, मेघेंचा कार्यकर्ता म्हणून वागणूक देऊ लागले. शेखर शेंडेंना पराभूत उमेदवार म्हणून टोमणे बसू लागले. त्यातच शेंडे गटाचे दिग्गज प्रमोद शेंडेंच्या हयातीतच गटाचे स्वतंत्र अस्तित्व हरवू लागल्याबद्दल चिंता दर्शवायचे.
खासदार मेघेंच्या कार्यक्रमातच शेखर शेंडेंची हजेरी असे चित्र गत दोन वर्षांपासून उमटू लागल्याने शेखर शेंडेंना अनेकांकडून स्वतंत्र अस्तित्व ठेवण्याचे सल्ले मिळाले. याची उपरती शेवटी शेखर शेंडेंना झाली. येळाकेळी व झडशी येथे गेल्या दोन दिवसात स्वतंत्रपणे मेळावे घेतले. सागर मेघेंच्या उपस्थितीत शेंडे समर्थकांनी स्पष्ट केले, तुम्ही आम्हाला ताकद द्या आम्ही तुम्हाला ताकद देऊ. शेंडे गटाला मानणारे कार्यकर्ते अद्यापही गावोगावी सक्रिय आहेत, हे दाखवून देण्यात शेखर शेंडे आजतरी यशस्वी झाल्याचे दिसून आले. स्वतंत्रपणे मेळावा घेण्याच्या पाश्र्वभूमीवर बोलताना शेखर शेंडे म्हणाले,  दादा (प्रमोद शेंडे) यांनी उभी केलेली फ ळी आजही आपल्यासोबत आहे. व्यक्तिगत लाभासाठी गटाला सोडून गेलेले अल्पसंख्येत आहेत. आपण आयोजित केलेले दोन्ही मेळावे हे शेंडे गटाचे अस्तित्व संपुष्टात आले म्हणणाऱ्यांना एक चपराक ठरावी. खासदार मेघेंसोबत आम्ही आहोतच. दोन्ही गटाचे जिल्ह्य़ात स्वतंत्र अस्तित्व राहणार आहे. मिळून काम करणार आहोत.
 शेंडे गटास वर्धा-सेलू-सिंदी पट्टय़ात एकाचवेळी रणजित कांबळे व आमदार प्रा. सुरेश देशमुख या दोन गटाशी टक्कर देतानाच स्वत:चे अस्तित्वही राखण्याचे आव्हान आहे. याच पाश्र्वभूमीवर उभयतांचे समान राजकीय शत्रू असल्याने सागर मेघे-शेखर शेंडे ही जोडी नजीकच्या काळात आक्रमक होण्याची चिन्हे आहेत.