शेतकरी कामगार पक्षाला पनवेल व उरण येथील विधानसभा निवडणुकीत पराजय पत्करावा लागला तरीही शेकापने नवी मुंबईत होणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीत आपले नशीब अजमावण्यासाठी मोर्चेबांधणी सुरू केली आहे.
नवी मुंबईमध्ये शेकापचे मध्यवर्ती कार्यालय सानपाडा येथील सेक्टर ११ मधील भूखंड क्रमांक ५ वरील इमारतीच्या गाळा क्रमांक १२ येथे सुरू करण्यात येणार असून या कार्यालयाचे उद्घाटन शुक्रवारी सायंकाळी आमदार जयंत पाटील यांच्या हस्ते होणार आहे.
शेकापचे विवेक पाटील यांनी नवी मुंबई पालिकेच्या परिसरातील १११ वॉर्ड क्रमांकावर आपले उमेदवार उभे करण्याचा मानस व्यक्त केला आहे. या उद्घाटन सोहळ्यात शेकापचे जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय नेते मोठय़ा संख्येने उपस्थित राहणार आहेत.
पनवेल व उरण मतदारसंघांमध्ये भाजप व शिवसेनेच्या मतांच्या लढाईत पिछाडीवर पडलेली शेकाप नवी मुंबईत कॉस्मोपॉलिटिक्स मतदारांना आकर्षित करण्यासाठी रणनीती आखत असल्याचे समजते.
नवी मुंबई पालिकेतील नवीन प्रभाग पद्धत व आरक्षणामुळे असमाधानी उमेदवारांना संघटित करून पालिकेत शेकापचे खाते उघडण्याचा हा प्रयत्न असल्याचे बोलले जाते.  शेकाप नवी मुंबईतील शहरी रहिवाशांच्या हितासाठी झटण्याचे स्वचित्र येथील मतदारांसमोर उभे करण्याचा प्रयत्न करणार आहे. आमदार जयंत पाटील यांनी शेकापचा प्रसार व्हावा यासाठी लोकसभा निवडणुकीपासून अनेक प्रयत्न केले आहेत.
आमदार पाटील यांच्या प्रयोगाचा मोठा फटका लोकसभा व विधानसभेच्या निवडणुकीत पक्षाला बसला आहे. शेकापचे अनेक नेते अंतर्गत आमदार पाटील यांच्या पक्षप्रसाराच्या निर्णयावर नाखूश होते. त्यामुळे नवी मुंबईतील शेकापचे भवितव्य एप्रिल महिन्यात होणाऱ्या पालिकेच्या निवडणुकीत ठरणार आहे.