04 March 2021

News Flash

लोककलांची श्रीमंती जगासमोर येण्यासाठी नागपुरात ‘शिल्पग्राम’चा केंद्राकडे प्रस्ताव

प्रदर्शनांच्या माध्यमातून ग्रामीण, आदिवासी कलावंतांची कला लोकांपुढे येत असली तरीही ती तेवढय़ापुरतेच मर्यादित राहते.

| March 17, 2015 07:12 am

प्रदर्शनांच्या माध्यमातून ग्रामीण, आदिवासी कलावंतांची कला लोकांपुढे येत असली तरीही ती तेवढय़ापुरतेच मर्यादित राहते. मात्र, या कलेला ‘शिल्पग्राम’च्या रूपाने कायमस्वरूपी छत उपलब्ध करून दिले तर या कलेचे कायमस्वरूपी जतन करता येईल. राजस्थानमधील उदयपूर येथे १३० एकरात, हैदराबादेत ६० एकरात शिल्पग्रामची निर्मिती करण्यात आली असून, पारपंरिक कला जोपासण्याचे काम तेथे होत आहे. नागपूर हे मध्यप्रदेश, छत्तीसगड, आंध्रप्रदेश, कर्नाटक या राज्याचे ‘गेट वे’ आहे. त्यामुळे या ठिकाणी शिल्पग्रामच्या निर्मितीचा प्रस्ताव केंद्राकडे पाठविण्यात आला आहे.
भारतीय कला आणि हस्तकलेची जोपासना व्हावी आणि कलावंतांना प्रेरणा मिळावी म्हणून सरकारने शिल्पग्रामच्या माध्यमातून व्यासपीठ उपलब्ध करून दिले. पारंपरिक हस्तकलेच्या जतनाकरिता या ठिकाणी वर्षभर पारंपरिक उत्सव आयोजित केले जातात. ग्रामीण भारतातील निसर्ग सौंदर्यासह भारतीय कला आणि मानवनिर्मित वस्तू एकाच व्यासपीठावर पाहायला मिळतात. नागपूर येथे दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्रात शिल्पग्रामच्या माध्यमातून मध्यप्रदेश, छत्तीसगड, महाराष्ट्र, आंध्रप्रदेश, कर्नाटकसारख्या अनेक राज्याची विविधता पाहायला मिळते. मात्र, याला वेळेचे बंधन असल्याने आणि हे शिल्पग्राम लहान पडत असल्याने वेगळ्या शिल्पग्राम उभारणीची गरज येथे आहे. नागपूर हे देशाच्या मध्यभागी असल्याने शहरातील झिरो माईलपासून १५ किलोमीटर अंतरावर ५० ते १०० एकर जागा राज्य सरकारने उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सातवरील पेंच-रामटेक-कन्हान या पर्यटन पट्टय़ात शिल्पग्रामची निर्मिती झाल्यास या परिसरात येणारा दूरदेशीचा पर्यटकसुद्धा सहजरित्या या शिल्पग्राममध्ये प्रवेश करेल. हे शिल्पग्राम म्हणजे संग्रहालयांची एक साखळी असेल. ज्यात मुखवटे-बाहुल्या, विणकाम, हातमाग, पारंपरिक पोशाख, दागिने, भांडी, तसेच आदिवासी व लोककला, हस्तकला, सूक्ष्म कला संग्रहालय आदींचा समावेश असेल.
ग्रामीण आणि आदिवासींच्या जीवनशैलीचे दर्शन घडविणाऱ्या झोपडय़ा या ठिकाणी असायला हव्यात, ज्यामुळे गावखेडय़ात पायही न ठेवलेला पर्यटक या ठिकाणी येऊन गावखेडय़ाचे दर्शन घेईल. ग्रामीण व आदिवासी निर्मित कलावस्तूंची मोठय़ा प्रमाणावर या ठिकाणी खरेदी-विक्री होऊन कलावंतांची कला जगासमोर पोहोचेल. ग्राहक थेट कलावंतांपर्यंत पोहोचतील. ३००, ८०० तसेच १५०० व्यक्तींसाठी सादरीकरण सभागृह, ५०० आसनव्यवस्था असलेले लहान सभागृह आणि विविधोपयोगी वापरासाठी प्रदर्शन सभागृह असेल. १०० आसनव्यवस्था असलेले कला आणि माहितीपट प्रदर्शनासाठी मल्टिप्लेक्स, दोन कलादालने, एक छायाचित्र गॅलरी या ठिकाणी करता येईल. ग्रामीण व आदिवासींना त्यांच्या कलेत अधिक निपूण करण्याकरिता त्यांना उत्तम दर्जाचे प्रशिक्षण, त्यांच्यातील कौशल्यविकासाला प्राधान्य देण्यासाठी प्रशिक्षण आदी या ठिकाणी राहील. विद्यार्थ्यांनी ही कला केवळ चित्रातून आणि पुस्तकातून बघितली आहे. शिल्पग्रामच्या माध्यमातून त्यांना ते प्रत्यक्षात अनुभवता येईल. ग्रामीण भारतातील ही श्रीमंती जगासमोर येण्यासाठी शिल्पग्राम हा एक उत्तम पर्याय असल्याचे वेदचे अध्यक्ष देवेंद्र पारेख व सरचिटणीस राहुल उपगन्लावार म्हणाले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 17, 2015 7:12 am

Web Title: shilpgram
टॅग : Nagpur
Next Stories
1 आताची उपचार पद्धत सोपी, बालक केंद्रित
2 जलयुक्त शिवार अभियान प्रभावीपणे राबवा – मुख्यमंत्री
3 नवप्रवर्तन ही यशाची किल्ली – गडकरी
Just Now!
X