कल्याण-डोंबिवली महापालिकेत स्थायी समितीवर वरचष्मा मिळविण्यासाठी शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना या दोन पक्षांत एकीकडे टोकाचा संघर्ष सुरू असताना दुसरीकडे ठाणे महापालिकेत याच पदासाठी झालेल्या सर्वपक्षीय समझोत्यामुळे या दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते बुचकळ्यात पडले आहेत.
मनसेचे ज्येष्ठ नगरसेवक सुधाकर चव्हाण यांची या पदासाठी बिनविरोध निवड करताना शिवसेनेचे संपर्कप्रमुख एकनाथ िशदे आणि राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष जितेंद्र आव्हाड या दोन नेत्यांमध्ये घडून आलेल्या समेटाची खमंग चर्चा सध्या रंगली आहे. तोंडावर आलेल्या महापौर निवडणुकीत संख्याबळाचे गणित जमवितानाच िशदे यांनी स्वपक्षातील प्रतापी नेत्यांना धक्का देण्याची दुहेरी चाल यानिमित्ताने खेळली असून यामुळे शिवसेनेतील अंतर्गत गटबाजी उफाळून येण्याची शक्यताही वर्तवली जात आहे.
बसपच्या दोघा नगरसेवकांचे नाराजीनाटय़, माजी उपमहापौर मिलिंद पाटणकर यांची अस्वस्थता, काँग्रेसच्या मुंब््रयातील नगरसेवकांवर असलेला जागता पहारा यामुळे तीन महिन्यांवर आलेल्या महापौर निवडणुकीत सहज विजय मिळविणे शिवसेनेला यंदा शक्य नाही.
भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक ऐन वेळी कसे बेपत्ता होतात याचा अनुभवही शिवसेनेने ठाणे आणि कल्याणात घेतला आहे. त्यामुळे फोडाफोडीच्या राजकारणात वेळ दवडत बसण्यापेक्षा सात नगरसेवकांचे बळ असलेल्या मनसेला आपलेसे करण्याकडे यंदा शिवसेनेचा कल आहे. त्यामुळेच स्थायी समितीत एकमेव सदस्य असलेले मनसेचे ज्येष्ठ नगरसेवक सुधाकर चव्हाण यांना सभापतिपद बहाल करून शिवसेनेने त्यांना उपकृत केल्याची चर्चा असली तरी हे करत असताना एकनाथ िशदे आणि जितेंद्र आव्हाड या दोन नेत्यांमध्ये झालेल्या समेटामुळे ठाणे महापालिकेतील राजकारणाला नवी दिशा मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
िशदे-आव्हाडांचे वैर संपुष्टात
ठाणे महापालिकेतील राजकारणावर वरचष्मा मिळविण्यासाठी गेल्या तीन वर्षांपासून िशदे आणि आव्हाडांमध्ये टोकाचे शह-काटशहाचे राजकारण सुरू आहे. गेल्या महापौर निवडणुकीत काँग्रेस पक्षाच्या मुंब््रयातील नगरसेवकांना गळाला लावत िशदे यांनी आव्हाडांचे समर्थक नजीब मुल्ला यांचा पराभव घडवून आणला. राज ठाकरे यांच्या समर्थनामुळे शिवसेनेचा महापौर निवडून आला, असे चित्र तेव्हा रंगविण्यात आले होते.
प्रत्यक्षात आव्हाडांना धक्का देत मुंब््रयातील नगरसेवकांना शिवसेनेने गळाला लावल्याने आघाडीचे गणित बिघडले आणि त्यामुळेच मनसेने शिवसेनेला साहाय्य केल्याची चर्चा होती. या निवडणुकीनंतर मनसेचे नगरसेवक आघाडीने स्थापन केलेल्या गटात सहभागी झाले. या सगळ्या राजकारणाचा केंद्रिबदू सातत्याने एकनाथ िशदे आणि जितेंद्र आव्हाड या दोन नेत्यांभोवती फिरत आहे.
पालकमंत्री गणेश नाईक आणि विधान परिषदेचे उपसभापती वसंत डावखरे यांच्या मनोमीलनामुळे गेल्या काही काळापासून आव्हाडांचे राजकारण अडचणीत आले आहे. िशदे यांनाही शिवसेनेत पूर्वीसारखे दिवस राहिलेले नाहीत. त्यामुळे हे दोन समदु:खी नेते एकत्र यावेत यासाठी गेल्या काही महिन्यांपासून दोन्ही पक्षांतील एक मोठा गट प्रयत्नशील होता. स्थायी समिती सभापतिपदाच्या निवडणुकीत मनसेच्या चव्हाणांची बिनविरोध निवड करताना या प्रयत्नांना यश आल्याचे बोलले जाते.
भाइंदरचा अडथळा
लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत एकनाथ िशदे यांचे ठाण्याकडे दुर्लक्ष होत असल्याच्या तक्रारी सातत्याने मातोश्रीवर पोहोचविल्या गेल्या. या घडामोडी ताज्या असतानाच मीरा-भाइंदर विभागाच्या संपर्कप्रमुखपदी आमदार प्रताप सरनाईक यांची नेमणूक केली गेल्याने िशदे यांना फारसे विचारात घेण्यात आले नाही, असे त्यांच्या समर्थकांचे म्हणणे आहे. हा विभाग यापूर्वी एकनाथ िशदे यांच्या अखत्यारीत येत असे. मात्र, सरनाईक यांनी अतिशय मेहनतीने या विभागात शिवसेनेची बांधणी केली आहे.
ऐन निवडणुकीच्या रणधुमाळीत मातोश्रीवरून हा बदल करण्यात आल्याने िशदेसमर्थक काहीसे अस्वस्थ होते. त्यामुळे  सुधाकर चव्हाण यांची बिनविरोध निवड करत िशदे समर्थकांनी एका दगडात दोन पक्षी मारल्याची चर्चा आता रंगली आहे. आव्हाडांशी समझोता करत चव्हाणांना सभापती करून िशदे यांनी महापालिकेच्या अर्थकारणावरील स्वत:ची पकड कायम ठेवली असून महापौर निवडणुकीत मनसेच्या मदतीचे दरवाजे खुले राहावेत, यासाठी काळजीही घेतली आहे.