पाण्याच्या आंदोलनांनी परिसर दणाणला
पोलिसांना चकवा देऊन आत्मदहनाचा प्रयत्न
जामखेड तालुक्याला पिण्याचे पाणी मिळावे यासाठी आमदार राम शिंदे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आत्मदहन करण्याचा इशारा देत पोलिसांना चकवा देण्याचा प्रयत्न केला. मोटारसायकलवर रंगीत वेशात जिल्हाधिकारी कार्यालयात प्रवेश केलेल्या त्यांना पोलिसांनी ओळखले व लगेचच ताब्यात घेतले. त्यानंतर त्यांनी सायंकाळी उशिरापर्यंत जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात ठिय्या आंदोलन केले.
मात्र, जिल्हाधिकारी डॉ. संजीवकुमार नसल्यामुळे शिंदे व त्यांच्या कार्यकर्त्यांचा सामना निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. सदानंद जाधव यांना करावा लागला. जामखेड तालुक्यासाठी चौंडी येथील कोल्हापूर पध्दतीच्या बंधाऱ्यात पाणी सोडण्याचे आदेश असताना ते पाटंबधारे खात्याच्या अधिकाऱ्यांनी डावलले, त्यांच्यावर कारवाई करावी व बंधाऱ्यात त्वरित पाणी सोडावे अशी आमदार शिंदे यांची मागणी होती. त्यासाठीच त्यांनी आत्मदहन करणार असल्याचे जाहीर केले होते. पाठीला सॅक लावून साध्या वेशभुषेत जिल्हाधिकारी कार्यालयात मागच्या बाजूने त्यांनी दुपारी १ वाजता प्रवेश केला, मात्र बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांनी त्यांना लगेचच ओळखले व ताब्यात घेतले.
जिल्हाधिकारी कार्यालयात सकाळपासून मोठा पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता. पोलीस उपअधीक्षक शाम घुगे, तसेच कोतवाली पोलीस ठाण्याचे निरीक्षक अभिमन पवार यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे येणारे चारही रस्ते बंद करून टाकले होते. नागरिकांना त्याचा अतोनात त्रास झाला, तसेच वाहतूक शाखेच्या पोलिसांची अरेरावी सहन करावी लागली. त्यातच भाजपचे माजी नगराध्यक्ष अभय आगरकर, नगरसेवक सचिन पारखी, शिवाजी लोंढे, नामदेव राऊत, अनिल मोहिते आदी अनेक पदाधिकाऱ्यांनी सकाळपासूनच जिल्हाधिकारी कार्यालयाच्या रस्त्यावर गर्दी केली होती. त्यामुळे सामान्य नागरिकांना रस्त्यावरून पायी जाणेही मुश्कील झाले होते.
पोलिसांनी ताब्यात घेतल्यावर आमदार शिंदे यांनी कार्यकर्त्यांसहीत जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनातच ठिय्या दिला. जिल्हा प्रशासनाचे आदेश असतानाही पाटबंधारे खात्याचे कर्मचारी ऐकत नाहीत, २६ नोव्हेंबरला पाणी सोडण्याचा आदेश होता, मात्र पाणी सोडले गेले नाही, त्यामुळे संबंधितांवर कडक कारवाई करावी व आजच्या आज पाणी सोडावे अशी मागणी त्यांनी केली. जिल्हाधिकारी डॉ. संजीवकुमार नसल्याने निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. जाधव यांनी आमदार शिंदे यांना सर्व परिस्थिती विस्ताराने सांगितली. पाणी सोडण्याचा प्रशासनाने आदेश दिला नव्हता तर फक्त पत्र दिले होते, त्यांना लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाशी संपर्क साधावा लागतो, त्यांनी पुढच्या आवर्तनाचे काय करणार, अशी विचारणा केल्यानंतर पाण्याचा हिशोब त्यांना दिला होता, मात्र नंतर पुढे काहीही झाले नाही, त्याबाबत त्यांच्याकडून खुलासा मागण्यात येईल, असे डॉ. जाधव यांनी सांगितले.
शिंदे यांनी ते अमान्य केले. पालकमंत्री पाचपुते यांच्या आदेशावरून जिल्हा प्रशासन व पाटबंधारे खाते जामखेडच्या नागरिकांवर अन्याय करत आहे, असा आरोप त्यांनी केला. पाणी सोडण्याचे आदेश होते, मात्र पाचपुते यांच्या तोंडी आदेशावरून ते पाळले गेले नाहीत असे ते म्हणाले. डॉ. जाधव यांनी मोबाईलवरून जिल्हाधिकाऱ्यांबरोबर चर्चा केली. त्यांनीही संबंधितांकडून खुलासा मागवून घेऊ असेच सांगितले, मात्र त्याचा उपयोग झाला नाही व शिंदे यांनी दालनातच ठिय्या आंदोलन सुरू केले. सायंकाळी उशिरापर्यंत कोणताही तोडगा निघालेला नव्हता, उशिरापर्यंत आंदोलन सुरूच होते.