03 March 2021

News Flash

पूर्व मुक्तमार्गावरून एसटीची ‘शीतल’ फेरी

दक्षिण मुंबई आणि नवी मुंबई यांच्यात महत्त्वाचा दुवा सांधणारा ‘पूर्व मुक्तमार्ग’ सुरू झाल्यानंतर बेस्ट आणि एसटी

| September 11, 2013 08:29 am

दक्षिण मुंबई आणि नवी मुंबई यांच्यात महत्त्वाचा दुवा सांधणारा ‘पूर्व मुक्तमार्ग’ सुरू झाल्यानंतर बेस्ट आणि एसटी या दोन्ही उपक्रमांनी त्याचा उत्तम वापर केला आहे. एसटीने या मार्गावरून सुरू केलेल्या साधारण गाडीच्या फेऱ्यांना भरभरून प्रतिसाद मिळू लागल्यानंतर एक पाऊल पुढे जात एसटी आता या मार्गावरून ‘शीतल वातानुकूलित’ सेवाही सुरू करीत आहे. २३ सप्टेंबरपासून सुरू होणारी ही गाडी दिवसातून पनवेल-मंत्रालय यादरम्यान चार फेऱ्या मारणार आहे. एसटीतर्फे होणारा पूर्व मुक्तमार्गाचा जास्तीत जास्त वापर पाहता एसटीने ‘बेस्ट’ला आव्हान देत मुंबईत आपले पाय पसरवण्यास सुरुवात केल्याची नांदी आहे, असे काही अधिकारीच खासगीत मान्य करत आहेत.
एसटीने याआधी मुंबईत कॉर्पोरेट सेवा सुरू करून बेस्टला धक्का दिला. त्यानंतर बेस्टच्या पाठोपाठ पूर्व मुक्तमार्गावरून पनवेलपर्यंत एसटी सेवा सुरू केली. या सेवेला सध्या उत्तम प्रतिसाद मिळत आहे. सकाळी पनवेल-मंत्रालय मार्गावरील दोन आणि संध्याकाळी मंत्रालय-पनवेल मार्गावरील दोन अशा चार फेऱ्या पूर्ण भरून जात आहेत. मात्र दुपारच्या वेळी दोन्ही बाजूंकडील फेऱ्यांना कमी प्रतिसाद असल्याने सरासरी टक्केवारी ७६ टक्के एवढी आहे. म्हणजे एका फेरीत सरासरी ३४ प्रवासी जातात. या मार्गावरील एका फेरीतून सरासरी १७६८ रुपये उत्पन्न मिळते, अशी माहिती एसटीचे सहाय्यक जनसंपर्क अधिकारी मुकुंद धस यांनी दिली.
हा वाढता प्रतिसाद लक्षात घेत एसटीने या मार्गावर पूर्व मुक्तमार्गावरून जाणारी शीतल सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. ही बस पनवेल येथून सकाळी ८.३० आणि सायंकाळी ४.३० या वेळेत मंत्रालयाकडे रवाना होईल. तर मंत्रालयाहून ही बस सकाळी १० आणि सायंकाळी ५.४५ ला पनवेलकडे जाईल. ३९ प्रवासी क्षमता असलेली ही बस पनवेल-खारघर-सीबीडी कोकण भवन-नेरूळ-वाशी-पूर्व मुक्तमार्ग-छत्रपती शिवाजी टर्मिनस-मंत्रालय या मार्गाने जाईल. ही बस सकाळी ११.१५ ते दुपारी ४.०० या दरम्यान ठाणे-पनवेल या मार्गावर चालवली जाणार आहे.
ही सेवा सुरुवातीला आठवडय़ाचे पाच दिवस चालवण्यात येणार आहे. मात्र प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळाल्यास आठवडय़ातील सर्व दिवस सेवा सुरू ठेवण्यात येईल, असे एसटीचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक दीपक कपूर यांनी सांगितले. तसेच नव्याने सुरू झालेल्या पूर्व मुक्तमार्गाचा एसटी पुरेपूर वापर करणार आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे भविष्यात एसटी मुंबईत आपले हातपाय पसरवण्यास तयार असल्याचे संकेतच त्यांनी अप्रत्यक्षपणे दिले आहेत.

‘शीतल’ सेवेचे तिकीट दर
प्रवास टप्पा    तिकीट दर
पनवेल-मंत्रालय    ९७
खारघर-मंत्रालय    ८६
कोकण भवन-मंत्रालय    ७६
नेरूळ-मंत्रालय    ७६
वाशी-मंत्रालय    ६०

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 11, 2013 8:29 am

Web Title: shital st bus runs on western freeway
Next Stories
1 जलवाहिन्यांभोवती संरक्षक भिंत बांधणार
2 रेल्वे बॉम्बस्फोटांची चौकशी एनआयएने करावी उच्च न्यायालयात याचिका
3 भाज्या जमिनीवर!
Just Now!
X