पोलिसांचा बंदोबस्त वाढला होता. रुग्णालयाच्या आवारात जागोजागी पोलीस दिसत होते. डॉक्टरांची धावपळ सुरू होती. वॉर्डामध्ये रुग्णांच्या सेवेत काही कमतरता तर राहिलेली नाही ना, याची दक्षता घेण्याचे आदेश वरिष्ठ पातळीवरून आले होते. अतिरिक्त आयुक्त जातीने हजर होते.. थोडय़ाच वेळत राज्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण शीव रुग्णालयात दाखल झाले. भराभर छायाचित्रे काढण्यात आली. थोडेसे हसून मुख्यमंत्र्यांनी वॉर्डात जाऊन रुग्णांची विचारपूस केली. काही मदत लागल्यास जरूर कळवा, असे तोंडभर सांगून मुख्यमंत्री निघून गेले.. रुग्णालयातील डॉक्टरांनी, पोलिसांनी सुटकेचा एक नि:श्वास सोडला.. आणि आपल्या कामाला लागले.
दिवा-सावंतवाडी गाडी रुळावरून घसरून झालेल्या अपघातातील जखमींवर शीव रुग्णालयात उपचार सुरू असून एकूण १७ रुग्ण येथे उपचार घेत आहेत. हे रुग्ण येथे आले तेव्हा सुरुवातीला आपत्कालीन वैद्यकीय सेवा विभाग तसेच ‘ट्रॉमा केअर सेंटर’मध्ये त्यांच्यावर उपचार करण्यात आले. त्यानंतर या रुग्णांसाठी ज्या विभागात स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली तेथे उपचारासाठी पाठविण्यात आले. दिवा-सावंतवाडी गाडीला अपघात झाल्यानंतर शीव रुग्णालयात किमान पन्नास रुग्ण येतील, अशी माहिती मिळाल्यामुळे कान-नाक-घसा विभाग तसेच अस्थिव्यंग विभागातील जागेत या रुग्णांची व्यवस्था करण्याचा निर्णय रुग्णालयाचे हंगामी अधिष्ठाता डॉ. सुलेमान र्मचट यांनी घेतला. प्रत्यक्षात येथे १७ रुग्ण दाखल झाले असून त्यातील समृद्धी या तीन वर्षांच्या मुलीची प्रकृती अद्याप गंभीर असल्यामुळे तिच्यावर ट्रॉमा के अर सेंटरमध्ये उपचार सुरू आहेत. समृद्धीवर काही शस्त्रक्रिया कराव्या लागणार असून तिची प्रकृती निश्चित सुधारेल, असा विश्वास येथील डॉक्टरांनी व्यक्त केला आहे. अन्य रुग्णांची परिस्थिती आता धोक्याच्या बाहेर असल्याचे डॉ. र्मचट म्हणाले. तथापि ‘ट्रॉमा सेंटर’ची परिस्थिती तसेच येथील कर्मचाऱ्यांची संख्या आणि उपचाराला येणारे रुग्ण यांचे प्रमाण लक्षात घेता ‘ट्रॉमा सेंटर’ची युद्धपातळीवर शस्त्रक्रिया करून या विभागाची परिस्थिती सुधारण्याची गरज असल्याचे दिसून आले.
अशा आहेत त्रुटी.. – शीवमधील ट्रॉमा विभाग हा अपघातग्रस्त रुग्णांसाठी जीवनदायी विभाग आहे. पूर्व व पश्चिम द्रुतगती महामार्गावर होणारे अपघात तसेच रेल्वे अपघातासह येथे मोठय़ा संख्येने अपघातात जखमी झालेले रुग्ण येत असतात. १४ बेड असलेल्या या विभागातील सहा व्हेंटिलेटरपैकी केवळ चार व्हेंटिलेटरच सुरू आहेत. शीव रुग्णालयात वर्षांकाठी अपघातात झखमी झालेले ३५ हजार रुग्ण उपचारासाठी येत असतात. सदर प्रतिनिधीने या विभागाला भेट दिली त्या वेळी स्पाइन म्हणजे पाठीच्या मणक्याचे चार गंभीर रुग्ण येथे होते, मात्र अस्थिव्यंग विभागाचा एकही निवासी डॉक्टर त्या ठिकाणी उपस्थित नव्हता. विशेष म्हणजे शल्यचिकित्सा, भूलतज्ज्ञ, अस्थिव्यंग चिकित्सा विभाग यात व्यापक समन्वय तसेच प्राध्यापक किंवा सहयोगी प्राध्यापक दर्जाचा एक वरिष्ठ डॉक्टर या ठिकाणी संपूर्ण दिवसभर उपस्थित राहणे अपेक्षित आहे. ट्रॉमा विभागात परिचारिका, चतुर्थ श्रेणी कर्मचारी, पुरुष परिचारिका आदींची संख्या खूपच कमी असल्याचे येथील डॉक्टरांचेच म्हणणे आहे. किमान चौदा व्हेंटिलेटर तसेच आवश्यक ती अन्य उपकरणे येथे मिळणे गरजेचे आहे. अनेकदा येथे इंजेक्शनही नातेवाइकांना बाहेरून आणण्यास सांगावे लागते, असे येथील परिचारिकांचेच म्हणणे आहे. १९७४ मध्ये प्रथम ट्रॉमा वॉर्ड सुरू करण्यात आला. त्यानंतर १९८५ साली क्लोरीन वायू गळतीच्या वेळी तसेच १९९४ सालच्या प्लेग आणि १९९६ साली भिवंडी येथील विषबाधा प्रकरणी या विभागाचे महत्त्व अधोरेखित झाले होते. स्पाइन ट्रॉलीही येथे अवघी एकच असल्यामुळे अनेकदा मणक्याला मार लागलेल्या रुग्णांना त्याचा फटका बसतो. यातील गंभीर बाब म्हणजे रुग्णांना सीटी स्कॅन अथवा एमआरआय काढायचा झाल्यास ट्रॉमा सेंटरमध्ये कोणतीही व्यवस्था नसल्यामुळे रुग्णालयाच्या अन्य भागांत घेऊन जावे लागते. यासाठी लागणारा वेळ हा रुग्णांसाठी जीवन-मरणाचा असतो, हे येथील डॉक्टरांनाही मान्य असून या विभागालाच उपचारांची गरज असून यासाठी नगरसेवक व आयुक्त कधी लक्ष देणार हा येथील डॉक्टरांचा लाखमोलाचा सवाल आहे.