रंकाळा तलावातील अतीव प्रदूषण व रंकाळ्याजवळील नादुरुस्त रस्त्यांची त्वरित दुरुस्ती व्हावी या मागणीसाठी शनिवारी शिवसेनेच्या वतीने रंकाळा तलावाजवळील मुख्य रस्त्यावर रास्ता रोको व ठिय्या आंदोलन करण्यात आले. आंदोलन करणारे शिवसेनेचे आमदार राजेश क्षीरसागर यांच्यासह शिवसैनिकांना पोलिसांनी ताब्यात घेतले.     
गणरायाचे आगमन होण्यास दोन दिवसांचा अवधी उरला आहे. मात्र शहरातील बहुतांशी रस्ते नादुरुस्त आहेत. याबाबत शिवसेनेच्या वतीने तीन वर्षे पाठपुरावा केला होता. तरीही रस्ते दुरुस्त झालेले नाहीत. रंकाळा तलावाच्या प्रदूषणाचा प्रश्नही गंभीर बनला आहे. दूषित पाण्यामुळे अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी शिवसेनेच्या वतीने रंकाळा तलावाजवळ रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.    
आंदोलनस्थळी महापालिकेचे पर्यावरण अधिकारी आर.के.पाटील आले होते. शिवसैनिकांनी त्यांच्यावर प्रश्नांचा भडिमार करीत धारेवर धरले. रंकाळा प्रदूषणाचा प्रश्न वारंवार चर्चेत असतानाही त्यावर उपाययोजना करण्यासाठी महापालिकेकडून थातूरमातूर कारणे सांगितली जातात. प्रदूषण रोखणारी उपाययोजना केली जात नाही. रंकाळ्याचे पाणी जनतेच्या आरोग्यासाठी धोकादायक बनले आहे. या सर्व प्रकारास जबाबदार कोण असा प्रश्न उपस्थित करीत अधिकाऱ्यांना जाब विचारण्यात आला. कारवाईचे ठोस आश्वासन मिळाल्याशिवाय जागेवरून हालणार नाही, असे म्हणत शिवसैनिकांनी तेथे ठिय्या आंदोलन सुरू केले. सुमारे अर्धा तास चाललेल्या या आंदोलनामुळे रंकाळा परिसरातील वाहतूक ठप्प झाली होती. आंदोलनात धनाजी दळवी, रणजित जाधव, किरण पडवळ, हरीभाऊ भोसले, तुकाराम साळोखे, रमेश खाडे, राजू कदम, मंगल कुलकर्णी, पूजा भोर आदींचा समावेश होता. अखेर पोलिसांनी आमदार राजेश क्षीरसागर यांना ताब्यात घेतले.