नाशिक व दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील मतमोजणीला सुरुवात झाल्यावर पहिल्या फेरीचा निकाल शुक्रवारी सकाळी नऊ वाजता जाहीर झाला. या फेरीत नाशिकमध्ये महायुतीचे हेमंत गोडसे, तर दिंडोरीत हरिश्चंद्र चव्हाण हे आघाडीवर होते. त्यानंतर पुढील फेरीत काही बदल घडेल, अशी प्रतिस्पर्धी काँग्रेस आघाडीची अपेक्षा होती. त्यामुळे प्रत्येक फेरीगणिक राजकीय पक्षांचे प्रतिनिधी व पदाधिकाऱ्यांची हुरहुर वाढत गेली; परंतु एकाही फेरीत प्रतिस्पर्धी उमेदवाराला आघाडी घेण्याची संधी मिळाली नाही. उलट महायुतीच्या उमेदवारांनी काँग्रेस आघाडीवरील आपली मतांची आघाडी वाढवत नेली आणि अखेरच्या फेरीपर्यंत विक्रमी मते मिळविली. जिल्ह्यातील दोन्ही जागांवर महायुतीने काँग्रेस आघाडीला धोबीपछाड दिल्याचे स्पष्ट झाले.
नाशिक व दिंडोरी मतदारसंघातील निवडणूक इतकी एकतर्फी होईल, याची अपेक्षा कोणीही केली नव्हती. सकाळी मतमोजणीला सुरुवात झाली, तेव्हा काही निवडक उमेदवार वगळता महायुती व काँग्रेस आघाडीचे उमेदवार मतमोजणीच्या ठिकाणी उपस्थित नव्हते. त्यांनी आपल्या प्रतिनिधींना या प्रक्रियेत समाविष्ट केले. निकाल ऐकण्यासाठी केंद्राबाहेर राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांची मोठी गर्दी झाली; परंतु निकालाचे पडसाद उमटू नयेत म्हणून पोलिसांनी कार्यकर्त्यांचे जत्थे समोरासमोर येणार नाहीत अशी व्यवस्था आधीच केली होती. यामुळे राजकीय पक्षांसाठी निश्चित केलेल्या वाहनतळावर थांबलेले पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे संपूर्ण लक्ष ध्वनिक्षेपकावरून जाहीर होणाऱ्या निकालाकडे होते. सकाळी नऊच्या सुमारास पहिल्या फेरीचा निकाल जाहीर झाला. त्यात नाशिक मतदारसंघात गोडसेंनी सात हजारांची, तर दिंडोरीत चव्हाणांनी १४ हजारांची आघाडी घेतली. या आकडेवारीने महायुतीच्या गोटात उत्साहाचे, तर काँग्रेस आघाडी व मनसेच्या गोटात अस्वस्थतेचे वातावरण पसरले. परंतु दोन्ही मतदारसंघांत नंतर अनुक्रमे २२ व २३ फेऱ्या बाकी असल्याने ही स्थिती बदलेल असे काँग्रेस व मनसेच्या पदाधिकाऱ्यांना वाटत होते; परंतु सुरुवातीपासून महायुतीच्या उमेदवारांची सुरू झालेली ही घोडदौड अखेपर्यंत कोणाला रोखता आली नाही.
नाशिक मतदारसंघात काँग्रेस आघाडीचे उमेदवार छगन भुजबळ हे राष्ट्रवादीचे दिग्गज नेते; परंतु त्यांनाही अखेपर्यंत महायुतीच्या हेमंत गोडसे यांनी वरचढ होऊ दिले नाही. उलट भुजबळांवरील त्यांची आघाडी प्रत्येक फेरीनुसार वाढत होती. अनेक फेऱ्यांमध्ये गोडसे पाच ते दहा हजार मतांची आघाडी घेत होते. केवळ सातवी फेरी त्यास अपवाद ठरली. या फेरीत गोडसेंनी भुजबळांवर घेतलेल्या आघाडीचे प्रमाण १८०३ मतांचे होते. त्यानंतर पुन्हा गोडसे सुसाट सुटले. अखेरच्या फेरीपर्यंत महायुती व काँग्रेस आघाडीच्या उमेदवारांमधील तफावत थोडीथोडकी नव्हे तर तब्बल एक लाख ८७ हजार ३३६ मतांनी वाढली. या मताधिक्याने महायुतीचे नेते व पदाधिकाऱ्यांना आश्चर्याचा धक्का बसला. रिंगणातील मनसेचे उमेदवार डॉ. प्रदीप पवार यांना ६३,०५०, डाव्या आघाडीचे तानाजी जायभावे यांना १७१५४, बसपाचे दिनकर पाटील यांना २०८९६, आपचे विजय पांढरे यांना ९६७२ मतांवर समाधान मानावे लागले.
दिंडोरी मतदारसंघात यापेक्षा वेगळी स्थिती नव्हती. महायुतीचे चव्हाण यांनी प्रतिस्पर्धी उमेदवारांना कोणतीही संधी दिली नाही. तिसऱ्या फेरीपर्यंत चव्हाण यांनी डॉ. पवार यांच्यावर ४० हजार मतांची आघाडी घेतली. आठव्या फेरीपर्यंत उभयतांच्या मतांमधील तफावत एक लाखाहून अधिकवर जाऊन पोहोचली. बाराव्या व तेराव्या फेरीदरम्यान चव्हाणांचे मताधिक्य काहीसे कमी झाले, पण पुढील फेऱ्यांमध्ये पुन्हा त्यांनी ती कसर भरून काढली. पंधराव्या फेरीत चव्हाणांनी जवळपास दीड लाखाचे मताधिक्य मिळविले. अखेरच्या फेरीपर्यंत चव्हाणांनी काँग्रेस आघाडीच्या उमेदवारावर दोन लाख ४७ हजार ६१९ मतांनी मताधिक्य मिळविले. या मतदारसंघात डाव्या आघाडीचे हेमंत वाघेरे यांना ७२५९९, बसपाचे शरद माळी यांना १७७३४, आपचे प्रा. ज्ञानेश्वर वाघ यांना ४०६७ मते मिळाली.

नाशिकमध्ये मनसेसह १३ उमेदवारांची अनामत रक्कम जप्त
नाशिक मतदारसंघात एकूण वैध मतांच्या एक षष्टमांश मते मिळवू न शकल्याने मनसेचे डॉ. प्रदीप पवार यांच्यासह डाव्या आघाडीचे तानाजी जायभावे, आपचे विजय पांढरे, बसपाचे दिनकर पाटील यांच्यासह इतर १३ उमेदवारांची अनामत रक्कम जप्त झाली. गतवेळी मनसेचा उमेदवार केवळ २२ हजार मतांनी पराभूत झाला होता. मनसेचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नाशिकमध्ये या पक्षाला जोरदार झटका बसला आहे. नाशिक मतदारसंघात वैध मतांची संख्या ९ लाख ३७ हजार ४०५ इतकी आहे. अनामत रक्कम वाचविण्यासाठी या मतांच्या एक षष्टमांश मते मिळणे गरजेचे होते. परंतु, विजयी उमेदवार महायुतीचे हेमंत गोडसे व पराभूत झालेले काँग्रेस आघाडीचे छगन भुजबळ यांच्या व्यतिरिक्त कोणाला ही रक्कम वाचविता आली नाही. दिंडोरी मतदारसंघात यापेक्षा वेगळी स्थिती नाही. तेथील आठ उमेदवारांना आपली अनामत रक्कम गमवावी लागली. दिंडोरीत वैध मतांची संख्या नऊ लाख ७० हजार १८२ इतकी होती. या ठिकाणी प्रत्येक उमेदवाराला एक लाख ६१ हजार ६९७ मते मिळणे आवश्यक होते. परंतु, महायुतीचे विजयी उमेदवार हरिश्चंद्र चव्हाण आणि पराभूत झालेल्या काँग्रेस आघाडीच्या डॉ. भारती पवार या दोघांव्यतिरिक्त कोणी तितकी मते प्राप्त करू शकले नाहीत. यामुळे डाव्या आघाडीचे हेमंत वाघेरे, बसपाचे शरद माळी, आपचे प्रा. ज्ञानेश्वर माळी यांच्यासह आठ उमेदवारांना आपली रक्कम गमवावी लागली.