नरेंद्र मोदी यांच्या लाटेमुळे परंपरागत काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या नांदगाव विधानसभा मतदार संघातील मनमाड, नांदगाव या शहरांसह ग्रामीण भागातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती गटात महायुतीने विक्रमी मताधिक्य घेतल्याने महायुतीतही उमेदवारीसाठी संघर्ष उभा राहण्याची चिन्हे आहेत. काही इच्छुकांनी त्यादृष्टिने प्रचारही सुरू केला आहे.
नांदगाव विधानसभा मतदारसंघातील ग्रामीण भागात हरिश्चंद्र चव्हाण यांनी एकतर्फी आघाडी घेत बहुतेक सर्वच मतदान केंद्रावर राष्ट्रवादीच्या भारती पवार यांची दाणादाण उडविली. तालुक्यातील ३१४ मतदान केंद्रावरील निकाल विद्यमान सत्ताधाऱ्यांसाठी विचार करावयास लावणारे आहेत. नांदगाव मतदारसंघात चव्हाण यांना १००२७२ तर, भारती पवार यांना ३६६०६ मते मिळाली. चव्हाण यांनी ६३६६५ मताधिक्य घेतले. मतदारसंघातील ३१४ मतदान केंद्रापैकी २८० केंद्रावर चव्हाण यांनी आघाडी घेतल्याचे स्पष्ट झाले आहे. ग्रामीण भागातून ९८८८८ मतांपैकी चव्हाण यांना ७६८८१ तर पवार यांना २२००७ मते मिळाली. म्हणजेच ग्रामीण भागातून चव्हाण यांनी एकूण ५४८७४ मतांची आघाडी घेतल्याचे स्पष्ट झाले आहे. ग्रामीण भागातील २३० मतदान केंद्रापैकी एखादा अपवाद वगळता बहुतेक सर्वच केंद्रावर चव्हाण यांनी मोठी आघाडी घेतल्याचे स्पष्ट झाले आहे. पवार यांना काही ठिकाणी तर तीन आकडी मतदानही मिळालेले नाही.
मनमाड शहरात झालेल्या एकूण २६ हजार ३७७ मतदानापैकी चव्हाण यांना १५९१७ तर पवार यांना १०४६० मते मिळाली.चव्हाण यांची आघाडी ५४५७ मतांची आहे. मनमाडमधील ५८ केंद्रांपैकी ४० केंद्रात चव्हाण यांनी आघाडी घेतली आहे. तर १८ केंद्रांवर पवार यांना किरकोळ स्वरुपाची आघाडी मिळाली आहे.
नांदगाव शहरात झालेल्या ११६१४ मतदानापैकी चव्हाण यांना ७४७४ तर पवार यांना अवघी ४१४० मते मिळाली. चव्हाण यांनी ३३३४ मतांची आघाडी घेतली. नांदगाव येथील ३६ केंद्रापैकी २३ केंद्रावर चव्हाण तर, अवघ्या तीन केंद्रावर पवार यांना आघाडी मिळाली. सहा केंद्रावर पवार यांना तीन आकडी संख्याही गाठला आली नाही.