महापौर व उपमहापौरपदाच्या निवडणुकीसाठी सेना, भाजप व विरोधी काँग्रेस व राष्ट्रवादीनेही रिंगणात उतरण्याची तयारी सुरू केल्यामुळे ही लढत दुरंगी होणार की तिरंगी याबद्दल उत्सुकता निर्माण झाली आहे. पक्षातील फाटाफूट टाळण्यासाठी मनसेच्या स्थानिक नेत्यांचे प्रयत्न सुरू आहेत. भाजपच्या बरोबरीने शिवसेनाही व्यूहरचना करत असताना विरोधकांनी जोरदार तयारी सुरू केल्यामुळे घोडेबाजार तेजीत येणार आहे. प्रचंड चुरस निर्माण झालेल्या या पदासाठी पहिल्या दिवशी मात्र एकाही इच्छुकाने अर्ज नेला नाही.
महापौर व उपमहापौरपदाची निवडणूक १२ सप्टेंबर रोजी होणार असल्याचे जाहीर झाल्यानंतर राजकीय घडामोडींनी चांगलाच वेग घेतला आहे. शुक्रवारी भाजप व शिवसेनेची या संदर्भात बैठक होणार आहे. गत वेळी भाजपच्या सहयोगाने मनसेने पालिकेची सत्ता प्राप्त केली होती. यंदा मनसेसह शिवसेनेने आपणास पाठिंबा द्यावा असा भाजपचा प्रयत्न आहे. दुसरीकडे शिवसेनेने आपला उमेदवार रिंगणात उतरण्याचे ठरवले आहे. स्थायी सभापतीच्या निवडणुकीत मनसेने भाजपला दगा दिला. मनसे व भाजप युतीचा प्रयोग फसला असल्याचे खुद्द भाजपच्या नेत्यांचे म्हणणे आहे. मनसेने दगा दिला असताना तेव्हा शिवसेना भाजपच्या पाठीमागे ठामपणे उभी राहिली. यामुळे महापौरपदाच्या निवडणुकीसाठी भाजप शिवसेनेच्या पाठिशी ठामपणे उभी राहील याची खात्री असल्याचे महानगर प्रमुख अजय बोरस्ते यांनी सांगितले.
निवडणुकीत एकेका मताला महत्त्व प्राप्त झाल्यामुळे सत्ताधारी मनसेने ३७ नगरसेवकांना अज्ञात स्थळी रवाना केले आहे. सहलीला न गेलेले नीलेश सोनार व शोभा शिंदे यांच्याबद्दल मनसेचे नेते फारसे काही बोलण्यास तयार नाहीत. काही नगरसेवक विरोधकांच्या गळाला लागल्याचे सांगितले जात असले तरी त्यास पक्षांकडून अधिकृत दुजोरा दिला जात नाही. मनसेची भूमिका सर्वस्वी राज ठाकरे यांच्यावर अवलंबून आहे. त्यांनी आपले पत्ते उघड केले नसले तरी पक्षांतर्गत फाटाफूट होऊ नये यासाठी स्थानिक नेत्यांची धडपड सुरू आहे. काँग्रेस व राष्ट्रवादीची बैठक होत आहे. अपक्ष गटाचे सहा सदस्य असले तरी एकाने आधीच भाजपमध्ये प्रवेश केला आहे. सत्तेच्या भोज्याला शिवण्यासाठी कोणाचे समीकरण जुळणार याबद्दल उत्सुकता निर्माण झाली आहे.
दरम्यान, अर्ज विक्रीला गुरुवारी सुरुवात झाली. इच्छुकांची संख्या बरीच मोठी असली तरी पहिल्या दिवशी एकानेही अर्ज नेला नसल्याचे नगरसचिव ए. बी. देशमुख यांनी सांगितले.