भारतीय सैनिकांवर पाकिस्तानने केलेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ शिवसेनेच्या वतीने शुक्रवारी शिवाजी चौकामध्ये पाकिस्तानाची ध्वजाची तसेच आमदार अकबरउद्दीन ओवेसी व पाकिस्तानी अतिरेकी हाफीज सय्यद यांच्या प्रतिमेची होळी करण्यात आली. जला दो जला दो पाकिस्तान जला दो, पाकिस्तानी सैन्यांचा धिक्कार असो अशा घोषणांनी शिवाजी चौकाचा परिसर दणाणून सोडला.
काश्मीर येथे गस्त घालत असलेल्या भारतीय जवानांवर पाकिस्तानी सैनिकांनी हल्ला केला. त्यामध्ये दोन भारतीय जवानांची क्रूरपणे हत्या करण्यात आली. तसेच हिंदू जनतेविरुध्द भडक वक्तव्य करणारे आमदार अकबरउद्दीन ओवेसी यांच्या निषेधार्थ शिवसैनिकांनी आंदोलन केले. शिवाजी चौकात जमलेल्या शिवसैनिकांनी पाकिस्तानी ध्वज व ओवेसी यांच्या प्रतिमेचे दहन केले.
आंदोलनात आमदार राजेश क्षीरसागर, रणजित जाधव, जयवंत हारुगले, उदय भोसले, तुकाराम साळोखे, जगदीश लिंग्रज, पूजा भोर, कमल पाटील, मंगल कुलकर्णी यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा समावेश होता.    यावेळी आमदार क्षीरसागर म्हणाले, संरक्षणमंत्री ए.के.अँटनी यांनी पाकिस्तानचा निषेध करण्यापेक्षा राजीनामा देऊन घरी जावे. सीमारेषेवरील कारभार सैन्यांच्या हाती द्यावा. भारतीय लष्कराची ताकद काय आहे हे ते पाकिस्तानी जवानांना दाखवून देतील. पाकिस्तानला सडेतोड उत्तर देण्याची हीच वेळ आहे. पाकिस्तानी सैनिकांनी केलेल्या भ्याड हल्ल्याचा शिवसेना निषेध करीत आहे.