शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे भव्य स्मारक उभारण्याच्या कामास मंजुरी दिल्यानंतर महापालिका मुख्यालयासमोरील कचराळी तलावात त्यांचा १५ फुटी पूर्णाकृती पुतळा उभारण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. मागील अर्थसंकल्पात शिवसेनाप्रमुखांच्या स्मारकासाठी सुमारे तीन कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती. स्मारक उभारण्यासाठी निविदा प्रक्रिया सुरू केल्यानंतर आता पूर्णाकृती पुतळ्यासाठी ९० लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. येत्या सर्वसाधारण सभेत यासंबंधीचा प्रस्ताव मान्यतेसाठी ठेवण्यात आला आहे.
शिवसेनेला पहिली सत्ता ठाण्याने मिळवून दिली. त्यामुळे शिवसेनाप्रमुख आणि ठाण्याचे नेहमीच वेगळे नाते राहिले आहे. मुंबईतील शिवाजी पार्कसोबत ठाण्याच्या सेंट्रल मैदानावर त्यांच्या गाजलेल्या सभा आजही अनेकांच्या स्मरणात आहेत. ठाण्यातील इटर्निटी मॉलमागे असलेल्या एका भल्यामोठय़ा भूखंडावर त्यांचे स्मारक उभारून शिवसेनाप्रमुख आणि ठाण्याचे हे नाते उलगडण्याचा प्रयत्न महापालिकेच्या माध्यमातून केला जाणार आहे. यासंबंधीच्या एका प्रस्तावास ऑगस्ट महिन्यात मंजुरी घेण्यात आली आहे. तसेच निविदा प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. ही प्रक्रिया अंतिम टप्प्यात असताना ठाणे महापालिका मुख्यालयासमोर शिवसेनाप्रमुखांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्याचा प्रस्ताव पुढे आला असून त्यासाठी ९० लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. यासंबंधीचा प्राथमिक प्रस्ताव वास्तुविशारद दिनेश वराडे आणि गोडबोले यांच्या माध्यमातून तयार करण्यात आला असून ब्रॉन्झचा हा पुतळा १२ ते १५ फुटी असावा अशा स्वरूपाचा प्राथमिक आराखडा तयार करण्यात आला आहे. यासंबंधीच्या प्रस्तावास महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत मंजुरी मिळाल्यानंतर तो राज्य सरकारच्या मंजुरीसाठी पाठविण्यात येणार आहे.