कागल शहरातील शासकीय योजनेतून बांधण्यात आलेली घरकुले बोगस लाभार्थीकडे सोपविण्याच्या हालचाली सुरू आहेत. तसेच घरकुलांचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे झाले असून बांधकाम विषयक निविदातील अटी, शर्तीचा भंग झाला आहे. या प्रकाराची सखोल चौकशी करण्यात यावी, अशी मागणी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विजय देवणे यांनी शुक्रवारी येथे पत्रकार परिषदेत केली. या मागणीचे निवेदन त्यांनी जिल्हाधिकारी राजाराम माने यांना सादर केले आहे.
 देवणे म्हणाले,की कागल शहरात १००२ बेघरांसाठी केंद्र व राज्य शासनाच्या निधीतून २४ कोटी रूपये खर्च करून घरकुले बांधली जात आहेत. घरकुलांचे लाभार्थी ठरवितांना मूळ निकष बाजूला ठेवून बोगस लाभार्थीची नांवे यादीत घुसडली आहेत. नगरसेवकांच्या भावाच्या नावावर घरकुले देण्याचा प्रकारही घडला आहे. याबाबत शिवसेनेने आंदोलन केल्यानंतर पात्र लाभार्थीची यादी जाहीर करण्याचे आश्वासन मुख्याधिकाऱ्यांनी दिले होते. मात्र ते राजकीय दबावाखाली काम करीत असल्याने लाभार्थींची वस्तुस्थिती समोर येत नाही. त्यामुळे बेघर लाभार्थी नेमके कोण याची चौकशी करून बोगस लाभार्थीवर कारवाई  करण्यात यावी, अशी शिवसेनेची मागणी आहे.    
घरकुलांच्या बांधकामाचा दर्जाही निकृष्ट झाला आहे. वाळूऐवजी दगड पावडर वापरली आहे. छतांना सिमेंटचा गिलावा केलेला नाही. बांधकाम विषयक अटींचा भंग झाला असल्याने भविष्यात इमारत पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे या कामांची तपासणी तज्ज्ञांकडून करण्यात यावी. निकृष्ट बांधकाम केल्याबद्दल ठेकेदार व संबंधित अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात यावेत, अशी मागणीही शिवसेनेने केली आहे. याबाबत उचित कारवाई न झाल्यास शिवसेनेच्यावतीने प्रशासनाविरूध्द उच्च न्यायालयात दाद मागावी लागेल, असा इशाराही देवणे यांनी दिला आहे.