लोकसभा निवडणुकीत दोन हात केल्यानंतर आता शिवसेना आणि मनसे अप्रत्यक्षपणे पुन्हा एकदा एकमेकांसमोर उभे ठाकण्याची शक्यता आहे. फक्त यावेळची रणधुमाळी निवडणुकीच्या मैदानाऐवजी मुंबई विद्यापीठाच्या कॅम्पसवर रंगणार आहे. विद्यापीठाच्या अधिसभा आणि व्यवस्थापन परिषदेवरील रिक्त जागांकरिता लवकरच निवड प्रक्रिया राबविली जाणार आहे. त्यावेळी या दोन प्रमुख पक्षांच्या युवा सेना आणि मनविसे या विद्यार्थी संघटना एकमेकांसमोर उभ्या ठाकतील.
युवा सेनेचे ज्येष्ठ नेते दिलीप करंडे यांच्या निधनामुळे गेले सात महिने अधिसभा आणि व्यवस्थापन परिषदेवरील पदवीधरांमधून भरावयाची जागा रिक्त आहे. ही जागा थेट मतदानाऐवजी स्थायी समितीमार्फत भरली जाणार आहे. न्यू लॉ कॉलेजचे प्राचार्य गोरक्ष राजाध्यक्ष यांच्या अध्यक्षतेखालील नऊ जणांची स्थायी समिती आधीच्याच तब्बल ४६ हजार पदवीधरांच्या मतदारयादीतून अधिसभेतील एक रिक्त जागा भरेल. त्यानंतर १० पदवीधर मतदारसंघातून निवडून आलेल्या सदस्यांमधून एकाची व्यवस्थापन परिषदेवर निवड केली जाईल. यासाठी ७ जूनला स्थायी समितीची बैठक घेण्यात येणार आहे, असे नुकतेच विद्यापीठाने काढलेल्या अधिसूचनेत स्पष्ट करण्यात आले आहे. पदवीधरांबरोबरच प्राध्यापकांमधील मधू परांजपे यांच्या निवृत्तीमुळे रिक्त झालेली अधिसभा आणि व्यवस्थापन परिषदेवरील एकेक जागा, वेगवेगळ्या अभ्यासमंडळांवरील सदस्य यांचीही निवड या बैठकीदरम्यान केली जाणार आहे. पण, खरी चुरस ही पदवीधरांच्या अधिसभा आणि व्यवस्थापन परिषदेवरील जागेकरिता असणार आहे.
मुंबई विद्यापीठाच्या विविध प्राधिकरणांच्या निवडणुकीत अभाविप (भाजप), एनएसयूआय (काँग्रेस), राष्ट्रवादीची विद्यार्थी संघटना यांनी गेल्या काही वर्षांत फारसा रस दाखविलेला नाही. सध्याच्या घडीला अधिसभेतील दहा सदस्यांमध्ये आठजण युवा सेनेचे तर दोघेजण मनविसेचे आहेत. यापैकी युवा सेनेतर्फे अधिसभा सदस्य प्रदीप सावंत (मुंबई), संजय वैराळ (मुंबई) आणि महादेव जगताप (ठाणे) यांची नावे व्यवस्थापन परिषदेवरील एका जागेकरिता चर्चेत आहेत. तर युवा सेनेतर्फे सुधाकर तांबोळी आपले नशीब व्यवस्थापन परिषदेकरिता अजमावतील. यापैकी सावंत हे विद्यापीठाच्या ‘विद्यार्थी तक्रार निवारण समिती’वर आहेत. त्यामुळे, त्यांच्याऐवजी वैराळ यांनी संधी मिळेल, अशी चर्चा आहे. पुनर्मूल्यांकनाचा, शिक्षकांच्या आरक्षित जागांचा प्रश्न, प्राध्यापकांचे प्रश्न हाताळण्याबरोबरच विविध कार्यशाळा, परिसंवाद यांच्या आयोजनात वैराळ अर्गेसर असतात. त्यामुळे, त्यांचेही नाव व्यवस्थापन परिषदेकरिता चर्चेत आहे. तर अधिसभेवरील एका जागेकरिता युवा सेनेतर्फे दिलीप करंडे यांच्या पत्नी सुप्रिया करंडे यांचे नाव चर्चेत आहे.
या शिवाय अधिसभेच्या एका जागेकरिता मनविसेतर्फे संतोष गांगुर्डे यांचे नाव चर्चेत आहे. दोन वर्षांपूर्वी खुद्द उच्च व शिक्षण मंत्री राजेश टोपे यांच्या नवी मुंबईतील महाविद्यालयातील गैरसोयी चव्हाटय़ावर आणल्यामुळे गांगुर्डे चर्चेत आले होते. त्यानंतर पेट परीक्षेतील त्रुटी, परीक्षा व्यवस्थेतील गोंधळ यावरून केलेल्या आंदोलनांमुळे गांगुर्डे यांचे मनविसेतील वजन वाढले.