उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसने महिनाभरापूर्वीच खासदार डॉ. पद्मसिंह पाटील यांचे नाव जाहीर केले आहे. शिवसेनेतील इच्छुकांची मांदियाळी मात्र सध्या मुंबईत तळ ठोकून आहे. उद्या (गुरुवारी) शिवसेनेकडून अधिकृत उमेदवार घोषित होणार असल्याची शक्यता आहे.
गेल्या निवडणुकीत तब्बल २५ उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. मात्र, डॉ. पाटील व सेना जिल्हाप्रमुख रवींद्र गायकवाड यांच्यात सरळ लढत झाली. उर्वरित २३ उमेदवारांच्या मतांची बेरीज लाखाच्या घरात आहे. डॉ. पाटील केवळ ६ हजार मतांच्या फरकाने निवडून आले होते. त्यामुळे आताही सेनेतील इच्छुकांना खासदारकीचे स्वप्न पडू लागले आहे. सेनेकडून मोठय़ा प्रमाणात इच्छुकांनी पक्षश्रेष्ठींकडे या ना त्या माग्रे लकडा लावला आहे. काहीजणांनी तर थेट बुआ, बाबा आणि महाराज यांचा वशिलाही पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यापर्यंत पोचविला. जिल्ह्यात सेनेला पूरक वातावरणाचा लाभ उठविण्यासाठी इच्छुकांनी उमेदवारीची माळ गळ्यात पडली की आपण खासदार झालोच, या आविर्भावात मुंबईत तळ ठोकला आहे.
पश्चिम महाराष्ट्रातील उद्योजक राजेंद्र मिरगणे, तानाजी सावंत, माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील, जिल्हाप्रमुख गायकवाड, उपजिल्हाप्रमुख सुधीर पाटील मुंबईत मुक्काम ठोकून आहेत. लोहारा येथे मंगळवारी रात्री अचानक गायकवाड यांना उमेदवारी मिळाल्याच्या कथित वृत्तावरून तासभर फटाक्यांची आतषबाजी झाली. या बाबत सेनेचे उमरगा लोहाऱ्याचे आमदार ज्ञानराज चौगुले यांच्याशी संपर्क केला असता अधिकृत घोषणा झाली नसली तरी गुरुवारी नाव जाहीर होण्याची शक्यता वर्तविली.