सांडपाणी पुनप्र्रक्रिया केंद्राचे आज भूमिपूजन
‘हिंदुस्थान कोकाकोला बेव्हरेजेस’ कंपनीच्या सहकार्याने माहीम कॉजवे येथील उदंचन केंद्रामध्ये प्रतिदिनी एक दशलक्ष लिटर क्षमतेचे सांडपाणी पुनर्वापर प्रक्रिया केंद्र उभारण्यात येत आहे. मात्र निवडणुकांच्या पाश्र्वभूमीवर शिवसेनेने घाईगर्दीत मंगळवारी (१८ फेब्रुवारी) या प्रकल्पाचे भूमिपूजन करण्याचा घाट घातला आहे.
माहीमच्या उदंचन केंद्रामध्ये ‘रोटेशन मीडिया बायोलॉजिकल रिअ‍ॅक्टर (आरएमबीआर)’ या तंत्रज्ञानावर आधारित सांडपाणी पुनर्वापर प्रक्रिया केंद्र उभारण्यात येणार आहे. या प्रकल्पाचा खर्च, तसेच सुरुवातीचे तीन महिने देखभालीचा खर्च हिंदुस्थान कोकाकोला बेव्हरेजेस कंपनी करणार आहे. मात्र या प्रकल्पाची मालकी महापालिकेकडेच राहणार आहे. प्रकल्पातून प्रतिदिन निर्माण होणाऱ्या प्रक्रियायुक्त पाण्याचे वितरण व वापराचे संपूर्ण अधिकार महापालिकेकडेच राहणार आहेत. या पाण्याचा उपयोग उदंचन केंद्रासमोरील विवेकानंद उद्यान आणि इतर उद्यानांसाठी करण्याचा पालिकेचा विचार आहे. याबाबतचा करार अलीकडेच करण्यात आला आहे. या प्रकल्पाच्या करारावर ३० जानेवारी रोजी अंतिम शिक्कामोर्तब झाले. त्यानंतर अवघ्या १७ दिवसांमध्येच या प्रकल्पाच्या भूमिपूजनाचा सोहळाही आयोजित करण्यात आला. यावरूनच सत्ताधारी शिवसेना-भाजप युतीने निवडणुकीवर डोळा ठेवून विकास कामांचा बार उडविण्यास सुरुवात केल्याची चर्चा सुरू झाली आहे. या प्रकल्पाचे उद्घाटन स्थायी समिती अध्यक्ष राहुल शेवाळे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.