वीज दरवाढीच्या विरोधात शिवसेनेच्या वतीने सोमवारी महावितरण कार्यालयावर तिरडी मोर्चा काढण्यात येऊन शासनाचे श्राद्ध घालण्यात आले. शासनाच्या अन्यायकारक धोरणामुळे उद्योजकांना राज्याबाहेर जावे लागत असल्याच्या प्रकाराचा निषेध नोंदवत शिवसैनिकांनी निदर्शने केली. महावितरणने सप्टेंबर महिन्यामध्ये घरगुती, कृषी, औद्योगिक, व्यापारी अशा सर्वप्रकारच्या वीज ग्राहकांच्या बिलामध्ये सुमारे २५ ते ५० टक्के इतकी वाढ केली आहे. या विरोधात राज्यभर प्रतिक्रिया उमटल्यानंतर अलीकडे शासनाने वीजदरात पंधरा ते वीस टक्के कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र शासनाचा हा निर्णय फसवा असून, महावितरणची वीज दरवाढ अन्यायकारक असल्याचे ठरवत सोमवारी शिवसेनेने आंदोलन केले.    
वीज दरवाढीच्या विरोधात शिवसैनिकांनी नागाळा पार्कातील आदित्य कॉर्नरपासून तिरडी यात्रा काढली. ती महावितरणच्या कार्यालयासमोर आल्यानंतर तेथे आमदार राजेश क्षीरसागर यांनी राज्यातील काँग्रेस-राष्ट्रवादीचे आघाडी शासन व महावितरणचे श्राद्ध घातले. या वेळी शिवसैनिकांनी महावितरणच्या कारभाराबद्दल जोरदार घोषणाबाजी केली. असहय़ वीज दरवाढीमुळे कोल्हापूरचा उद्योजक कर्नाटकच्या वाटेवर चालला आहे. उद्योजकांनी वीजदराबाबत व्यक्त केलेल्या अपेक्षेला शासन व महावितरणने प्रतिसाद द्यावी, अशी मागणी क्षीरसागर यांनी केली. आंदोलनात शिवाजी जाधव, हर्षल सुर्वे, विश्वजित मोहिते, रमेश खाडे, तुकाराम साळुंखे, रणजित जाधव यांच्यासह शिवसैनिक सहभागी झाले होते.