जैतापूरचा वीज प्रकल्प पूर्णत्वास गेल्यास राज्य विजेबाबत स्वयंपूर्ण तर होईलच. शिवाय अन्य राज्यांनाही वीज विकता येणे शक्य होणार आहे. मात्र या चांगल्या प्रकल्पात शिवसेना आडकाठी आणण्याचे काम करत आहे. तर भाजपा त्यांच्यासोबत जात आहे. विरोधकांनी या प्रकल्पासाठी विरोधासाठी विरोध न करता शासनाला सहकार्य करावे, असे आवाहन शनिवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.    
महाराष्ट्र राज्य विद्युत पारेशन कंपनीच्या वतीने शनिवारी बिद्री, हमीदवाडा व कुरणी या कागल तालुक्यातील तीन वीज उपकेंद्रांचे उद्घाटन पवार यांच्या हस्ते झाले. एकूण २० कोटी ५० लाख रुपये खर्चाच्या कामामुळे शेतक ऱ्यांना रात्री दहा तास व दिवसा आठ तास आणि औद्योगिक क्षेत्रासाठी चोवीस तास वीज उपलब्ध होणार असल्याचे या वेळी सांगण्यात आले.
पवार म्हणाले, राज्याच्या ऊर्जा विभागामार्फत विविध स्वरूपाच्या योजना व प्रकल्प राबविले जात आहेत. त्याचा फायदा भविष्यातील कित्येक पिढय़ांना होणार आहे. वीज ही जीवनावश्यक बाब असून ती समाजातील सर्व लोकांसाठी उपलब्ध करण्याचा तसेच राज्य भारनियमन मुक्त करण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. राज्यात येत्या काही दिवसात ऊर्जा विभागात सात हजार पदांची भरती करण्यात येणार आहे. आतापर्यंत पन्नास टक्के भरतीचे काम पूर्ण झाले असून ती पारदर्शी व गुणवत्तेनुसार होईल, असा निर्वाळा त्यांनी दिला.    
या कार्यक्रमास कामगारमंत्री हसन मुश्रीफ, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष आमदार के.पी.पाटील, जिल्हाधिकारी राजाराम माने, महापारेशनचे अध्यक्ष अरविंद सिंह, प्रकल्प संचालक ओमप्रकाश यम्पाल उपस्थित होते.