News Flash

वेशीवर वादाचा ‘झेंडा’

पालिकेने जाहिरातींसाठी १०० मीटरची वेस घातल्यामुळे ठिकठिकाणच्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांमध्ये वितुष्ट निर्माण झाले आहे. याच वादातून माहीममध्ये शिवसेना आणि मनसेचे कार्यकर्ते एकमेकांसमोर ठाकले आहेत.

| August 29, 2014 01:30 am

पालिकेने जाहिरातींसाठी १०० मीटरची वेस घातल्यामुळे ठिकठिकाणच्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांमध्ये वितुष्ट निर्माण झाले आहे. याच वादातून माहीममध्ये शिवसेना आणि मनसेचे कार्यकर्ते एकमेकांसमोर ठाकले आहेत. हा वाद मिटविण्यासाठी कुणीच पुढाकार घेत नसल्याने ऐन गणेशोत्सवात हे प्रकरण हातघाईवर जाण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या उत्पन्नाच्या स्रोतांपैकी एक मुख्य म्हणजे जाहिरातींचे बॅनर्स. राजकीय नेते, बडय़ा कंपन्या, संस्था, बँका, विकासकांकडून मिळणाऱ्या मोठय़ा रकमांच्या बॅनर्सच्या माध्यमातून गणेशोत्सवातील बहुतांश खर्च भागविला जातो. अनेक गणेशोत्सव मंडळांचे जाहिरातींचे बॅनर्स मुख्य मंडपापासून दूपर्यंत झळकविण्यात येत होते. मंडपापासून १०० मीटर अंतराबाहेर जाहिरात झळकविण्यासाठी पालिका मडळांवर व्यावसायीक दराची आकारणी करीत होती. परंतु यंदा व्यावासायिक दराने जाहिराती झळकविण्यास पालिकेने पूर्णत: बंदीच घातली आहे. तसेच मंडळांना जाहिराती झळकविण्यासाठी मंडपापासून केवळ १०० मीटर अंतराची वेस घालून दिली आहे.
मुंबईमधील छोटय़ा छोटय़ा गल्ल्यांमध्ये सार्वजनिक गणेशोत्सव साजरा केला जातो. अनेक मंडळांचे मंडप जवळजवळ आहेत. पूर्वी ही मंडळे सामजस्याने एकमेकाच्या हद्दीमध्ये जाहिरीतींचे बॅनर्स लावत होते. परंतु यंदा पालिकेने १०० मीटरची वेस घालून दिल्यामुळे अनेक मंडळांमध्ये जाहिरातींचे फलक झळकविण्यावरुन वितुष्ट निर्माण झाले आहे. १०० मीटरची वेस ओलांडण्यास पालिकेकडून कारवाई होईल या भीतीमुळे मंडळे चिंतीत झाली आहेत.
मुंबईतील अनेक मंडळांचे मंडप हाकेच्या अंतरावर आहेत. काही ठिकाणी तर १०० मीटरच्या परिघात दोन मंडळांचे मंडप आहेत. परिणामी उपलब्ध जागेत जाहिराती लावण्याची स्पर्धा या मंडळांमध्ये लागली आहे. मोठय़ा गणेशोत्सव मंडळांच्या जाहिराती दूपर्यंत झळकविण्यात येत होत्या. परंतु यंदा पालिकेने जागेची मार्यादा घातल्याने जाहिराती कुठे लावायच्या असा प्रश्न या मंडळांपुढे निर्माण झाला आहे. काही मंडळांनी पालिकेने घातलेली जागेची मर्यादा धुडकावून थेट दूपर्यंत जाहिरातींचे बॅनर्स झळकविले आहेत. त्यामुळे वाटेतील छोटय़ा मंडळांना बॅनर्स लावण्यासाठी जागाच शिल्लक राहिलेली नाही. परिणामी छोटय़ा-मोठय़ा मंडळांमध्ये वितुष्ट आले आहे.
माहीममध्ये वादाची ठिणगी
याच वादातून माहीममध्ये शिवसेना आणि मनसेमध्ये ठिणगी पडली आहे. गेली अनेक वर्षे बाल मित्र सार्वजनिक श्री गणेशोत्सव मंडळा (माहीमचा राजा)च्या जाहिराती दूपर्यंत झळकविण्यात येत होत्या. या मंडळात शिवसेनेचे पदाधिकारी कार्यरत आहेत. मनसेच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी आणि याच भागातील मृदुंगचार्य नारायण कोळी मैदान सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आणि दर्यासारंग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी ‘माहीमच्या राजा’च्या जाहिराती आपल्या हद्दीत जाहिराती झळकविण्यास आक्षेप घेतला आहे. पालिकेनेही या वादाकडे दुर्लक्ष केले आहे. परिणामी हे प्रकरण आता पोलीस ठाण्यात गेले आहे. मात्र गणेशोत्सवादरम्यान या मंडळांच्या कार्यकर्त्यांमध्ये वाद उफाळून येण्याची चिन्हे आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 29, 2014 1:30 am

Web Title: shiv sena mns clashes over 100 meters advertisement for ganesh mandal
Next Stories
1 झिम्मा-फुगडीने श्रावण साजरा
2 व्यवसायातील अपयशाने त्याला चोर बनवले
3 आता संचार देशभर! ‘डेक्कन ओडिसी’ पुन्हा धावणार
Just Now!
X