लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत विदर्भातील विविध जिल्ह्य़ांत भाजपचे वाढते प्राबल्य बघता शिवसेनेने आता संघटन मजबूत करण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू केले असून तसे आदेश शिवसेना उद्धव ठाकरे यांनी नागपूर भेटीत विदर्भातील नेत्यांना दिले असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
विधानसभा निवडणुकीत भाजप शिवसेनेची युती संपुष्टात आल्यानंतर सेनेने स्वबळावर निवडणुका लढण्याचा निर्णय घेतला. निवडणुकीत विदर्भातून ६२ पैकी ४४ जागा भाजपला देऊन वैदर्भीय जनतेने भाजपच्या सोबत खंबीरपणे उभे राहून महाराष्ट्रात सरकार स्थापन करण्यासाठी वैदर्भीय जनतेने मोठे योगदान दिले. विदर्भातील विविध मतदारसंघात शिवसेनेचे उमेदवार निवडणूक लढले मात्र त्यांना केवळ चार जागेवर समाधान मानावे लागले होते. गेल्या काही दिवसात विदर्भातील कार्यकर्त्यांंचे संघटन कमकुवत झाले होते. जिल्हाध्यक्षपदावरून अनेक जिल्ह्य़ात वाद सुरूच आहेत. सेनेचे माजी जिल्हा प्रमुख शेखर सावरबांधे पक्षातून बाहेर पडून अपक्ष म्हणून निवडणूक लढले होते त्यामुळे जिल्ह्य़ातील अनेक शिवसैनिक त्यांच्या पाठीशी असताना जिल्ह्य़ात शिवसेना एकसंघ दिसत नव्हता.
केंद्रीय मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विदर्भात प्राबल्य वाढत असताना तालुक्यात आणि जिल्ह्य़ात भाजपचे संघटन वाढले. शिवसेनेचे संघटनात्मक काम मात्र कमी झाले होते. कार्यकर्त्यांंमध्ये उत्साह नव्हता. त्याचा परिणाम म्हणून विधानसभा निवडणुकीत त्यांना फारसे यश मिळाले नाही. अनेक शिवसैनिकांची जमानत जप्त झाली होती. राज्यात सत्तेमध्ये सहभागी झाल्यानंतर विदर्भातील कार्यकर्त्यांंमध्ये पुन्हा एकदा उर्मी आली असून आता त्यांनी विदर्भावर लक्ष केंद्रित केले आहे. बुधवारी शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे आणि युवा नेते आदित्य ठाकरे नागपुरात आले असता त्यांनी विदर्भातील विजयी आणि पराभूत उमेदवारासोबतच जिल्हा प्रमुखांची बैठक घेऊन त्यांना संघटनात्मक काम वाढविण्याच्या दृष्टीने सूचना केल्या.
विदर्भात शेतकऱ्यांच्या होत असलेल्या आत्महत्या बघता विदर्भातील आमदार आणि प्रमुख नेत्यांना सोबत घेऊन विदर्भातील दुष्काळग्रस्त भागाचा दौरा करणार असल्याचे उद्धव ठाकरे यांनी सांगितल्यामुळे येणाऱ्या काळात शिवसेना विदर्भात सक्रिय होणार असल्याची चिन्हे आहेत.  विदर्भाच्या वेगवेगळ्या प्रश्नावर लक्ष केंद्रित करुन ते सोडविण्यासाठी प्रयत्न करा, असे आदेश उद्धव ठाकरे यांनी कार्यकर्त्यांंना दिले. येणाऱ्या काळात विदर्भातील विविध जिल्ह्य़ात शिवसेनेच्या कार्यकारिणीमध्ये मोठे फेरबदल होण्याची शक्यता आहे त्या दृष्टीने लवकरच सेनेचे काही पदाधिकारी बैठक घेणार आहेत. भाजपचे विदर्भात प्राबल्य वाढत असताना आता विदर्भातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवून शिवसेना सक्रिय होऊन संघटनात्मक काम वाढविण्याच्या दृष्टीने प्रयत्न करणार हे मात्र तितकेच खरे.