चिकोत्रा धरणातील पाणीउपसा बंदीचा निर्णय पाटबंधारे विभागास मागे घेण्यास शुक्रवारी शिवसेनेने भाग पाडले. शिवसेनेच्यावतीने पिंपळगाव (ता.भुदरगड) येथे रास्तारोको आंदोलन केले.
या वेळी दूधगंगा प्रकल्पाचे उपकार्यकारी अभियंता बी.के.पाटील यांनी हा निर्णय मागे घेत असल्याचे घोषित केले. या निर्णयामुळे पुन्हा एकदा चिकोत्रा प्रकल्पातून पाणी वाहण्यास सुरूवात झाली असून शेतकऱ्यांना पुन्हा एकदा पाणी उपलब्ध झाले आहे. चिकोत्रा प्रकल्पातील पाणीसाठा ७८ टक्के असल्याने चिकोत्रा नदी काठाजवळील कृषी पंपासाठी पाणीउपसा बंद करण्याचा निर्णय पाटबंधारे विभागाने घेतला होता.
यामुळे शेतकरी हवालदिल झाला होता.त्याची दखल घेत शिवसेनेच्यावतीने उपसाबंदी रद्द करावी, या मागणीसाठी शुक्रवारी पिंपळगाव येथे रास्तारोको आंदोलन करण्यात आले.
शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विजय देवणे, भुदरगड तालुका प्रमुख प्रकाश पाटील, सुरेश पाटील, प्रवीण सावंत, महिला आघाडी संघटक सुषमा चव्हाण, मेरी डिसोझा यांच्या नेतृत्वाखाली दुपारी ३ वाजताआंदोलनाला सुरूवात झाली. निर्णय घेत नाही तोपर्यंत हटणार नाही, अशी भूमिका घेतल्याने या मार्गावरील वाहतूक खोळंबली होती. सुमारे दीड तासानंतर पाटबंधारे व महावितरणचे अधिकारी तेथे पोहचले. दूधगंगा प्रकल्पाचे अभियंता पाटील यांना वस्तुस्थितीची माहिती दिल्यानंतर त्यांनी उपसाबंदी मागे घेतल्याचे जाहीर केले.
महावितरणच्या अधिकाऱ्यांकडे विजय देवणे यांनी तीन दिवस दिवसा व तीन रात्री अशी पाण्याची पाळी बंद करून फक्त दिवसाच शेतीसाठी पाणी सोडण्यात यावे, अशी मागणी केली. रात्री पंप सुरू केला की तो रात्रभर सुरू राहिल्याने पाणी वाया जाते. तर दिवसा पुरेशा प्रमाणात पाण्याचा वापर होऊन बचत होईल,असेही त्यांनी निदर्शनास आणून दिले.