अभियांत्रिकी व वैद्यकीय शिक्षण घेण्यास प्रवेशपूर्ण परीक्षेची तयारी करण्यासाठी इच्छुक विद्यार्थ्यांनादहावीनंतर खाजगी शिकवणी लावावी लागते. याचाच फायदा घेऊन शिकवणी वर्गाचे संचालक पालक आणि विद्यार्थ्यांची फसवणूक करत असून या व्यवसायात कनिष्ठ महाविद्यालयाचे काही प्राचार्यदेखील सामील असल्याचा आरोप माजी उपमहापौर व शिवसेनेचे जिल्हा प्रमुख शेखर सावरबांधे यांनी केला आहे. अनुदानित महाविद्यालयात शिकवणी वर्गाना महाविद्यालयांच्या वेळेतच परवानगी देण्याची वाईट परंपरा शहरात रूजू लागली असून याला शिक्षण खात्याने आताच आळा घातला नाही तर याचे दुष्परिणाम भविष्यात भोगावे लागणार असून याविरोधात शिवसेना आक्रमक होणार असल्याचा इशारा दिला आहे.
शिवसेना कुणाच्या विरोधात नाही परंतु, अनुदानित महाविद्यालयांमध्ये असे दलालीचे प्रकार होणे शिक्षण क्षेत्राच्या दृष्टीने घातक आहे. विना अनुदानित शाळांबद्दल आम्ही बोलणार नाही कारण तो त्यांचा प्रश्न आहे. ‘क्रीम’ महाविद्यालयात प्रवेश घेणाऱ्या साऱ्याच विद्यार्थ्यांची घरची परिस्थिती श्रीमंतीची नसते. ४० ते ५० टक्के मुले गरीब असतात. त्यांना शिकवणी लावणे परवडणारे नसल्याने महाविद्यालयातील वर्गाना हजेरी लावून अभ्यास करावा लागतो. परंतु, त्यांच्यावर शिकवणी लावण्यासाठी दबाव आणला जात आहे. वर्गात शिकवले जात नसल्याने विद्यार्थीच नसतात, या वस्तुस्थितीकडे त्यांनी लक्ष वेधले.    
शहरातील अनेक विद्यार्थी शिकवणी वर्गाच्या फसवणुकीमुळे नामवंत अभियांत्रिकी व वैद्यकीय महाविद्यालयातील प्रवेशापासून वंचित आहेत. कापरेरेट सेक्टरसारखे हे शिकवणी वर्ग सुरू असून विद्यार्थ्यांकडून लाखो रुपये शुल्क उकळले जात आहे. मासिक एक ते दीड लाख रुपये पगारावर काम करणारे शिक्षक दिल्ली किंवा कोटावरून फ्रेंचायजी घेऊन शिकवणी मालक ठेवतात.  शिकवणी वर्गाचे संचालक पहिल्या बॅचचे विद्याथी चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाले तर आणि त्यांना नामवंत महाविद्यालयात प्रवेश मिळाला की त्यांचे फोटो छापून स्वत:च्या वर्गाचे मार्केटिंग करीत आहेत. सामान्य शिक्षक शिकविण्यासाठी ठेवतात. त्यामुळे तज्ज्ञ शिक्षकांचे मार्गदर्शन न मिळाल्यामुळे अनेक विद्यार्थी मागे पडत असून पालकांनी यापासून सावध राहण्याचे आवाहन सावरबांधे यांनी केले आहे.
शिक्षणाच्या या व्यवसायात कनिष्ठ महाविद्यालयाचे काही प्राचार्यसुद्धा सामील असून विशिष्ट वर्गातच तुम्ही जर तुम्हा लावले तर तुम्हाला दहावी, बारावीच्या वर्गात येण्याची आवश्यकता नसून तुमची उपस्थिती दाखविल्या जाईल, असेही सांगितले जाते. नागपुरातील नामवंत महाविद्यालयाने महाविद्यालयाच्या प्रांगणातच शिकवणीवर्गाच्या शिक्षकांना वर्ग घेण्यास परवानगी दिली आणि प्रात्याक्षिक गुण कमी देऊ असा धाक दाखवून त्याच शिकवणी वर्गात प्रवेश घेण्यास भाग पाडले, असाही आरोप शेखर सावरबांधे यांनी केला आहे.
शिक्षण उपसंचालकांना पत्र
 या सर्व प्रकाराविषयी शिक्षण उपसंचालकांना जाणीव करून संबंधित शाळांवर कारवाई करण्याची मागणी शिक्षण उपसंचालकांना पाठविण्यात आले असून आता टय़ूशन क्लासेसचे संचालक आणि महाविद्यालयांच्या प्राचार्यानाही पत्रे पाठविली जाणार आहेत. शिक्षकांची नावे जाहिरातीत, पत्रकावर, नोटीस बोर्डावर शिकवणी वर्गाच्या संचालकांनी लावावी, ती बॅच संपेपर्यंत त्या शिक्षकाला शिकविणे बंधनकारक करावे, तसेच १५ दिवस शिकवणी वर्गात प्रवेश घेण्यापूर्वी शिक्षकाच्या वर्गात फुकट बसू द्यावे आदी मागण्याही सावरबांधे यांनी यावेळी केल्या. शिवसेनेच्या त्रिसदस्यीय समितीच्यावतीने वरील तत्त्वांचे पालन करण्यासाठी शिकवणी वर्गाच्या संचालकांना आग्रह करण्यात येणार आहे, असे त्यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले.