लांबवर पसरलेला विस्तृत प्रभाग आणि मतदारसंख्या अवघी साडेसहा हजार. एकीकडे मध्यवर्गीयांच्या रो हाऊसिंगमधील दाट लोकवस्ती तर दुसरीकडे स्वतंत्र बंगल्यातील विरळ लोकवस्ती. पूर्वीचा भाजप आणि राष्ट्रवादीच्या नगरसेवसकांचा आता एक झालेला प्रभाग. मुळातच विरोधभासाचे वातावरण असलेला प्रभाग ११. येथे शिवसेनेच्या जिल्हाप्रमुखालाच बंडखोराचा सामना करावा लागतो आहे. या बंडखोरीला पाठबळ कोणाचे, हेही प्रचारात बंडखोराने लपून ठेवलेले नाही. त्यामुळे पक्षांतर्गत झुंजही तेथे रंगली आहे. म्हणूनच या लढतीकडे लक्ष आहे. शिवाय स्थानिक-बाहेरचा असाही प्रचार रंगू लागला आहे.
पत्रकार चौक ते थोलार हॉस्पिटल, मनपा कार्यालय ते सरकारी विश्रामगृह, पुढे गुलमोहोर रस्त्याची उजवी बाजू ते पारिजात चौक, प्रोफेसर कॉलनी ते सिव्हिल हडकोचा निम्मा भाग, मिस्किन मळा ते तारकपूर असा हा प्रभाग अस्ताव्यस्त पसरला आहे. तेथील समस्याही बऱ्याचशा लांबलचक पसरलेल्या आहेत. बराचसा युतीकडे झुकलेला मतदारवर्ग. अनेक बंगल्यातून मुले बाहेरगावी विशेषत: पुणे-मुंबईत नोकरीला असल्याने नगरमध्ये घरी आई-वडील किंवा वृद्ध दाम्पत्य आता एकटेच आहेत. त्यामुळे प्रभागातील बराचसा मतदार ठरावीक कॉलनीतून एकवटला गेला आहे.
शिवसेनेचे जिल्हाप्रमुख शशिकांत गाडे यांचे चिरंजीव योगिराज या प्रभागातून प्रथमच निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. राष्ट्रवादीचे अजिंक्य बोरकर व शिवसेनेचे बंडखोर अशोक दहिफळे यांच्यासह सहा उमेदवार अ मध्ये आहेत. तिघेही एकमेकांना प्रतिस्पर्धी मानायला तयार नाहीत. गाडे यांना भाजपच्या लढाऊ नगरसेविका संगीता खरमाळे यांच्या उमेदवारीची तर बोरकर यांना विद्यमान नगरसेविका इंदर कौर गंभीर यांच्या उमेदवारीची साथ मिळाली आहे. त्यामुळे दहिफळे यांनीही एका महिला उमेदवाराच्या मदतीने प्रचार सुरू केला आहे. गंभीर यांच्या प्रभागाकडील दुर्लक्षावर मतदार नाराजी व्यक्त करताना दिसतात.
केवळ जिल्हाप्रमुखांचा मुलगा म्हणून मला उमेदवारी मिळालेली नाही तर रोटरी, यश प्रतिष्ठानच्या माध्यमातून राबवलेले सामाजिक उपक्रम, विद्यार्थी चळवळीमुळे निर्माण झालेले नेतृत्वगुण, लहानपणापासूनचे घरातील वातावरण यामुळे आपण निवडणुकीच्या रिंगणात उतरल्याचे स्पष्टीकरण योगीराज देतात. वडिलांच्या भ्रष्टाचार मुक्त, निष्ठावान या गुणांचा मतदारांपुढे जाताना चांगला उपयोग होतो, हे ते आवर्जून सांगतात. अजिंक्य बोरकर तरुण बांधकाम व्यावसायिक आहेत. आपण स्थानिक आहोत, ते दोघेही बाहेरचे आहेत, प्रभागातील नाहीत, आपल्याला राजकीय वारसाही नाही, परंतु केव्हाही मदतीला धावणारा, संपर्कासाठी उपलब्ध होणारा म्हणून आपल्याला प्रतिसाद मिळत असल्याचा दावा अजिंक्य करतात. माझ्यावर शिवसेनेत अन्याय झाला, अनेक वर्षे निष्ठेने काम करून व आमदारांनी न्याय देण्याचा प्रयत्न करूनही उमेदवारीत डावलले गेले, आपण शिवसैनिकच आहोत, असा थेट प्रचार दहिफळे करतात. प्रभागातील बराचसा भाग आपल्या जुन्या मतदारसंघातीलच आहे. त्यामुळे आपण‘बाहेरचा नाही, असा खुलासाही ते करतात. लोकशाहीत कोणालाही निवडणूक लढवायचा हक्क आहे, असे सांगत योगिराज बंडखोरीबद्दल बोलणे टाळतात व त्याऐवजी मतदारांच्या प्रश्नाला प्राधान्य हवे, असा आग्रह धरतात. आपण केव्हाही उपलब्ध होऊ शकतो. मोबाइल, इंटरनेटच्या जमान्यात स्थानिक, बाहेरचा असा काही फरक राहिला नाही, असेही योगिराज सांगतात.
प्रभागातील सर्वसाधारण महिला मतदारसंघात (ब) संगीता खरमाळे (भाजप) व इंदरकौर गंभीर (राष्ट्रवादी) या दोन विद्यमान नगरसेविकांमध्ये थेट लढत होत आहे.
(चौकट- १)
मतदारसंख्या
६ हजार ४६७. पुरुष-३ हजार ९२, महिला-३ हजार ७५
 उमेदवार
अ- अजिंक्य बोरकर (राष्ट्रवादी), अशोक दहिफळे (अपक्ष), योगिराज गाडे (शिवसेना), किशोर कोटकर (मनसे), बाळासाहेब पुंड (अपक्ष), चंद्रसेन साळवे (अपक्ष). ब- इंदरकौर गंभीर (राष्ट्रवादी), संगीता खरमाळे (भाजप), भारती नवलाणी (अपक्ष).