वादळी पावसाने झालेले नुकसान असो अथवा तहानलेल्यांना पाणी देण्याचा विषय असो.. या गंभीर प्रश्नांवरूनही राजकारण करण्याची पूर्वाश्रमीची परंपरा नवनिर्वाचित खासदार हेमंत गोडसे आणि शिवसेनेच्या बाहुबली पदाधिकाऱ्यांनी कायम ठेवल्याचे अधोरेखित होत आहे. सलग दोन दिवस झालेल्या वादळी पावसाचा जिल्ह्यातील बहुतांश भागाला जोरदार तडाखा बसून त्यात प्रचंड नुकसान झाले. नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्याचा सोपस्कार लोकप्रतिनिधी या नात्याने गोडसे यांनी अगदी तत्परतेने पार पाडला. लोकसभा निवडणुकीपूर्वी नुकसानग्रस्तांचे घरोघरी जाऊन सांत्वन करणाऱ्या गोडसेंनी निवडणुकीच्या निकालानंतर मात्र नांदूरच्या एकाच द्राक्षबागेला भेट देत संपूर्ण मतदारसंघातील नुकसानीची माहिती अधिकाऱ्यांकरवी जागेवरच जाणून घेणे इष्ट मानले. दुसरीकडे पाण्यासाठी आसुसलेल्या मनमाडकरांना अचानक प्रचारकी थाटाने टँकरने पाणी देण्याच्या सेनेचे बाहुबली पदाधिकारी सुहास कांदे यांच्या उपक्रमामागे आगामी विधानसभा निवडणुकीचे समीकरण दडल्याची चर्चा आहे.
नैसर्गिक आपत्तीमुळे संकट कोसळले की, राजकीय नेत्यांच्या आलिशान मोटारी ग्रामीण भागात नुकसानग्रस्त शेतीची पाहणी अन् शेतकऱ्यांच्या सांत्वनासाठी भ्रमंती करू लागतात. त्यांच्याकडून दिली जाणारी आश्वासने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्याही चांगलीच अंगवळणी पडली आहेत. लोकसभा निवडणूक जाहीर होण्याच्या सुमारास झालेली गारपीट व अवकाळी पावसाने शेतीचे अतोनात नुकसान केले. प्रचाराच्या काळात सत्ताधाऱ्यांप्रमाणे विरोधकांनी या मुद्दय़ाचे भांडवल करण्यात कसूर ठेवली नाही. निवडणुकीत फटका बसू नये म्हणून नुकसानग्रस्तांना तातडीने मदत देण्यासाठी सत्ताधारी काँग्रेस व राष्ट्रवादीने जशी धडपड केली, तसेच भाजप व सेनेने या मुद्दय़ावरून सत्ताधाऱ्यांना घेरण्याची संधी सोडली नाही. नाशिक लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार गोडसे यांनी तर ग्रामीण भागातील आपल्या प्रचाराच्या कार्यपद्धतीत पूर्णपणे बदल करून घेतला. शेतकरी कुटुंबाची पाश्र्वभूमी लाभलेल्या गोडसेंनी प्रचार काळात नुकसानग्रस्तांच्या घरी जाऊन दिलासा देण्यावर कटाक्षाने लक्ष दिले. लोकसभेत विजयी झाल्यानंतर मात्र त्यांच्या कार्यपद्धतीत बदल झाल्याचे स्पष्टपणे जाणवत आहे.
नुकत्याच झालेल्या वादळी पावसाच्या नुकसानीची पाहणी करताना ही बाब ठळकपणे समोर आली. वादळी पावसाने मतदारसंघातील नाशिक, सिन्नर व इगतपुरी तालुक्यात मोठे नुकसान झाले. कामाच्या वाढलेल्या व्यापामुळे त्यांना उपरोक्त भागात पाहणी करणे शक्य झाले नसावे. त्यामुळे शहरालगतच्या नांदूर येथील साहेबराव माळोदे यांच्या द्राक्षबागेच्या नुकसानीची त्यांनी पाहणी केली. उर्वरित भागातील नुकसानीबद्दल गोडसे यांनी तहसीलदारांकडून माहिती घेतली. म्हणजे, ते इतरत्र पाहणी करण्यास गेले नाहीत. नुकसानग्रस्तांना शासकीय मदत लवकरात लवकर मिळण्यासाठी प्रयत्नशील राहण्याचे आश्वासन गोडसे यांनी उपस्थित शेतकऱ्यांना दिले. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने धडाकेबाज सुरुवात केल्याचा परिणाम बहुधा शिवसेनेच्या खासदारांवरही झाला असावा. त्यामुळेच की काय, केंद्रीय अर्थमंत्रिपदाची धुरा अरुण जेटली सांभाळत असतानाच त्यांच्या पुढय़ात सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी निधीच्या मागणीचे निवेदन गोडसेंनी तत्परतेने सोपवून दिले आणि त्यास रीतसर प्रसिद्धी मिळेल याची व्यवस्था केली.
मागील वर्षी नाशिक जिल्ह्यास प्रचंड दुष्काळाचा सामना करावा लागला होता. तेव्हा भुजबळ फाऊंडेशनने आपले मतदारसंघ लक्षात घेऊन टँकर, गाव तळ्यांतील गाळ काढणे, पावसाचे पाणी जमिनीत जिरविण्यासाठी चर खोदणे असे अनेक उपक्रम राबविले होते. इतर राजकीय पक्ष आपापल्या परीने तशी धडपड करत होते. विद्यमान खासदार गोडसे यांनी तसा प्रयोग त्र्यंबकेश्वर व इगतपुरीतील दुर्गम भागात राबविला होता. त्याची पुनरावृत्ती आता विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर करत राजकारणाचे डाव रचले जात आहेत. शिवसेनेत दाखल झालेले सुहास कांदे यांनी नांदगाव मतदारसंघात टँकरने पाणी देण्याचा सुरू केलेला उपक्रम त्याचाच एक भाग असल्याचे लक्षात येते. याशिवाय नांदगावकरांच्या सेवेत रुग्णवाहिका लोकार्पण करण्याचा सोहळा वाजतगाजत पार पडला. पाणी देणारे टँकर आणि या रुग्णवाहिका अगदी प्रचारकी थाटात सजविल्या गेल्यामुळे स्थानिकांना त्यातील राजकारण उमगले आहे.