कोल्हापूर जिल्ह्य़ामध्ये सुरू असलेल्या खताचा काळाबाजार आणि जादा दराची विक्री याप्रश्नी गुरुवारी शिवसेनेने जिल्हा कृषी अधीक्षक उमेश पाटील यांच्याशी चर्चा केली. शेतक ऱ्यांच्या होत असलेल्या आर्थिक पिळवणुकीकडे त्यांचे लक्ष वेधण्यात आले. याची दखल घेत अधीक्षक पाटील यांनी जादा दराने खत विक्री करणाऱ्या, खताचा काळाबाजार करणाऱ्या विक्रेत्यांचा परवाना रद्द करण्याचे आश्वासन दिले.    
कोल्हापूर जिल्ह्य़ात यंदाच्या हंगामात २० हजार टन खताची आवश्यकता आहे. जिल्ह्य़ाचे खरीप क्षेत्र ३.१० लाख हेक्टर आहे. खरीप हंगामात ऊस ३.३८ लाख, भात १ लाख, नागली २३ हजार, सोयाबीन ६५ हजार, भुईमूग ६२ हजार हेक्टर पीक घेतले जाते. पावसाळा सुरू झाल्याने सध्या शेतक ऱ्यांकडून अमोनिया सल्फेटची मागणी वाढली आहे. तथापि खत वितरण व्यवस्था असणारा तालुका संघ व सेवा संस्था यांच्यातून खताची लिकिंग व काळाबाजार होत आहे. तसेच ठरावीक भांडवलदारांना व खाजगी व्यापाऱ्यांना जादा खताचा साठा दिल्याने ते खताचा काळाबाजार करीत आहे, अशा तक्रारी शिवसेनेकडे शेतक ऱ्यांनी केल्या होत्या.     
या प्रश्नी चर्चा करण्यासाठी शिवसेनेचे आमदार चंद्रदीप नरके, जिल्हाप्रमुख संजय पवार, जिल्हाप्रमुख विजय देवणे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळ जिल्हा अधीक्षक उमेश पाटील यांना गुरुवारी भेटले. गतवर्षीची सुफला खत व अमोनिया सल्फेड यांची विक्री पाहता या वर्षी खताचा पुरवठा अधिक प्रमाणात करण्यात यावा, खताची टंचाई करून काळाबाजार करणाऱ्यांवर धाड टाकण्यात यावी, खत तपासणी करणाऱ्या वायुवेग पथकात सक्षम अधिकारी नेमावेत आदी मागण्या पाटील यांच्याकडे करण्यात आल्या. त्यावर पाटील यांनी वरील प्रमाणे कारवाईचे आश्वासन दिले. तसेच खत दरामध्ये शेतक ऱ्यांची फसवणूक होऊ नये यासाठी तालुका संघ व खत व्यापाऱ्यांकडे खताचे दरपत्रक दर्शनी भागात लावण्याचे त्यांनी मान्य केले. खताची खरेदी विक्री किती झाली याची तपासणीही करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. या वेळी जिल्हा महिला संघटक सुषमा चव्हाण, शुभांगी साळोखे, युवा जिल्हा अधिकारी हर्षल सुर्वे, संदीप पाटील, अभिषेक देवणे, वाहतूक सेना जिल्हाध्यक्ष हर्षल पाटील, अप्पा पुणेकर, अभिजित बुकशेट यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते.