महावितरणचे काम करीत असताना मृत्युमुखी पडलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना पुरेशी नुकसान भरपाई द्यावी या मागणीसाठी सोमवारी शिवसेनेच्यावतीने महावितरण कार्यालयासमोर भरपावसात निदर्शने करण्यात आली. अधीक्षक अभियंता कुमठेकर यांना घेराओ घालण्यात आला.     
गेल्या आठवडय़ात महावितरणचे काम करीत असताना एका कंत्राटी कर्मचाऱ्याचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाला होता. असे प्रकार यापूर्वीही अनेकदा घडले आहेत. मात्र महावितरण तसेच ठेकेदारांकडून पीडित कुटुंबीयांना ठोस मदत केली जात नाही. या धोरणामध्ये बदल होऊन पीडित कुटुंबातील वारसांना महावितरणने सेवेत सामावून घ्यावे. तसेच त्यांना किमान ५ लाख रुपयांची नुकसान भरपाई मिळावी अशी शिवसेनेची मागणी आहे.     
या मागणीसाठी शिवसेनेने महावितरण कार्यालयासमोर निदर्शने केली. महावितरणच्या हलगर्जी व भोंगळ कारभाराच्या निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या. आमदार चंद्रदीप नरके, जिल्हाप्रमुख संजय पवार, जिल्हाप्रमुख विजय देवणे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन झाले. यानंतर पक्षाचे शिष्टमंडळ अधीक्षक अभियंता कुमठेकर यांना भेटले. यावेळी महावितरणने कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी योग्य ती साधनसामग्री पुरवावी, अशी मागणी करण्यात आली.