कराड अर्बन स्पोर्ट्स क्लबने आयोजित केलेल्या क्रिकेट स्पर्धाचा उपक्रम स्तुत्य असून, या स्पर्धामधून आपले व्यक्तिमत्त्व घडवावे असे आवाहन जिल्हा सहकार उपनिबंधक आनंद कटके यांनी केले.
स्पोर्ट्स क्लबच्या माध्यमातून कराड येथील शिवाजी स्टेडियमवर आयोजित केलेल्या तिसऱ्या आंतरशालेय क्रिकेट स्पध्रेच्या पारितोषिक वितरण समारंभप्रसंगी बोलत होते.  अर्बन कुटुंबप्रमुख सुभाषराव जोशी, बँकेचे अध्यक्ष डॉ. सुभाषराव एरम, उपाध्यक्ष डॉ. राजीव आहिरे, कराड अर्बन बझारचे अध्यक्ष विद्याधर गोखले, बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप गुरव, कराडचे सहकार उपनिबंधक अविनाश देशमुख यांच्यासह बँकेचे व अर्बन बझारचे संचालक, सभासद, ग्राहक व सेवक तसेच हितचिंतकांची या वेळी उपस्थिती होती.
या स्पर्धामधून कराडमधील ज्युनिअर क्रिकेटपटूंना निश्चितच प्रोत्साहन मिळेल असा विश्वास बँकेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी विश्वनाथ केशव जोशी यांनी व्यक्त केला. ते कराड अर्बन बँक स्पोर्ट्स क्लबतर्फे आयोजित तिसऱ्या कराड तालुका आंतरशालेय क्रिकेट स्पध्रेच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते.
स्पध्रेमध्ये १८ संघ सहभागी झाले. या स्पर्धा बाद आणि साखळी पद्धतीने पार पडल्या. या स्पध्रेत श्री शिवाजी विद्यालय कराडचा संघ विजेता ठरला. तर टिळक हायस्कूल कराडचा संघ उपविजेता ठरला.
स्पध्रेतील इतर पारितोषिके   पुढीलप्रमाणे :- उत्कृष्ट क्षेत्ररक्षक- गणेश जोगर (श्री शिवाजी विद्यालय), उत्कृष्ट यष्टिरक्षक – धिरज कोलगे (शिवाजी विद्यालय, ३ स्टमपिंग), उत्कृष्ट फलंदाज – सगर सोनद (श्री शिवाजी विद्यालय, १०५ धावा), उत्कृष्ट गोलंदाज-चैतन्य कांबळे (श्री शिवाजी विद्यालय, ११ विकेट्स), उत्कृष्ट अष्टपैलू-सगर सोनद (श्री शिवाजी विद्यालय ) यांना बक्षिसे देण्यात आली.
स्पर्धा यशस्वी रीत्या पार पडण्यासाठी स्पोर्ट्स क्लबचे अध्यक्ष दिलीप चिंचकर, गौतम गुणकी, राजू सावंत यांनी विशेष प्रयत्न केले.