समर्थ समाजाच्या स. है. जोंधळे विद्या समूहाचे अध्यक्ष शिवाजीराव जोंधळे यांच्यासह अन्य दोघांची गोळीबाराच्या प्रकरणातून कल्याण न्यायालयाने निदरेष मुक्तता केली. शिवाजीराव यांच्या नातेवा़ईकांनीच त्यांच्या विरुद्ध गोळीबार केल्याची तक्रार सात वर्षांपूर्वी विष्णुनगर पोलीस ठाण्यात केली होती.  हर्षकुमार खरे, जीतेंद्र राय आणि शिवाजीराव जोंधळे यांनी गोळीबार केल्याची तक्रार सात वर्षांपूर्वी त्यांचे नातेवाईक सागर व देवेंद्र जोंधळे, नारायण पटारे यांनी विष्णुनगर पोलीस ठाण्यात केली होती. कल्याण न्यायालयात या प्रकरणाचा खटला सुरू होता. पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी करून कल्याण न्यायालयात अहवाल दाखल केला होता. सागर जोंधळे यांनी हा अहवाल नाकारला होता. त्यामुळे न्यायालयाने या प्रकरणाच्या पुनरचौकशीचे आदेश दिले होते. शिवाजीराव जोंधळे यांनी याप्रकरणी उच्च न्यायालयात दाद मागितली होती.
न्यायालयाने हे प्रकरण पुन्हा कल्याण न्यायालयाकडे पाठवले होते. या प्रकरणाच्या चौकशीचा पोलिसांचा दुसरा अहवालही फिर्यादी देवेंद्र यांनी नाकारला. न्यायालयाने वादी, प्रतिवादीचे म्हणणे ऐकून, कागदपत्र, अहवालांची सत्यता तपासून फिर्यादीच्या तक्रारीत तथ्य नसल्याचे स्पष्ट करीत, शिवाजीराव जोंधळे, हर्षकुमार खरे यांची याप्रकरणातून निदरेष मुक्तता करीत असल्याचा निर्णय दिला.