शाळा, महाविद्यालयांतच विद्यार्थ्यांना खऱ्या अर्थाने शिस्त लागते, शिस्त अंगी बाणवता येते. तसेच  समाजप्रती आत्मीयता  विद्यार्थ्यांमध्ये निर्माण होत असते. विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जाणीव निर्माण करण्यासोबत समाजाचे दु:ख जाणणारे विद्यार्थी समाजकार्य महाविद्यालये घडवितात, असे प्रतिपादन सामाजिक न्यायमंत्री शिवाजीराव मोघे यांनी केले.
सावित्री ज्योतीराव समाजकार्य महाविद्यालयाच्या विद्यार्थी वसतिगृहाचे उद्घाटन शिवाजीराव मोघे यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार अण्णासाहेब पारवेकर, तर प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषद सदस्य देवानंद पवार, विजय पाटील चालबर्डीकर, संस्थेचे उपाध्यक्ष डॉ. रमाकांत कोलते, संचालक अशोक नारखेडे, डॉ. जयंत देशमुख, प्राचार्य उमरे, प्रा. अविनाश  शिके आदी उपस्थित होते.  
सामाजिक आपुलकी जोपासणारा वर्ग निर्माण होणे आवश्यक आहे. समाजाचे दु:ख  समजून घेण्यासाठी समाजकार्य महाविद्यालये महत्त्वाचे योगदान देत आहेत. राज्यात बहुतांश समाजकार्य महाविद्यालये अनुदान तत्त्वावर कार्यरत आहे. भविष्यात विनाअनुदानित तत्त्वावरील समाजकार्य महाविद्यालये सुरू करण्याचा विचार असल्याचे ते म्हणाले.
व्यसनमुक्तीवर प्रकाश टाकताना ते म्हणाले, युवकांनी व्यसनांपासून दूर राहिले पाहिजे, असे सांगून व्यसनमुक्ती धोरण राबविणारे महाराष्ट्र देशातील पहिले राज्य असल्याचा उल्लेखही त्यांनी यावेळी केला. माजी आमदार अण्णासाहेब पारवेकर यांचेही याप्रसंगी भाषण झाले. महिला वसतिगृहांमध्ये महिला अधीक्षिका नेमण्याच्या कामाला शासनाने गती द्यावी, असे ते म्हणाले. संस्थेचे  उपाध्यक्ष डॉ. रमाकांत कोलते यांचेही याप्रसंगी भाषण झाले. डॉ.अविनाश शिर्के यांनी महाविद्यालयाच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या विविध सामाजिक कामांवर प्रकाश टाकला. या वेळी उच्च शिक्षण विभागाच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या युवा जागर अभियानांतर्गत संगणक कक्षाचे उद्घाटनही मोघे यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. घनश्याम दरणे यांनी केले, तर आभार प्राचार्य उमरे यांनी मानले. कार्यक्रमाला विद्यार्थी मोठय़ा संख्येने उपस्थित होते.