छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा बसवेश्वर व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांच्या जयंतीचे औचित्य साधून सोलापुरात शिवालय परिवाराच्या वतीने येत्या १०, ११ व १२ मे रोजी बौध्दिक व्याख्यानमाला व शिवालय पुरस्कार वितरण सोहळा आयोजिला आहे.
हुतात्मा स्मृतिमंदिरात दररोज सायंकाळी सहा वाजता आयोजिलेल्या या बौध्दिक व्याख्यानमालेचे उद्घाटन दि. १० रोजी पोलीस आयुक्त प्रदीप रासकर यांच्या हस्ते होणार आहे. शिवसेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख विश्वनाथ नेरुरकर हे अध्यक्षस्थानी असतील. यावेळी सेनेचे जिल्हा सह संपर्कप्रमुख पुरुषोत्तम बरडे, जिल्हाप्रमुख लक्ष्मीकांत ठोंगे-पाटील, शहरप्रमुख प्रताप चव्हाण आदी उपस्थित राहणार आहेत. व्याख्यानमालेचे पहिले पुष्प शिवछत्रपती चरित्राचे अभ्यासक प्रा. अरुण घोडके हे गुंफणार असून त्यांच्या व्याख्यानाचा विषय ‘शिवछत्रपती ते शंभूराजे जीवनप्रवास’ असा आहे. तर दि. ११ रोजी प्रा. नितीन बानगुडे-पाटील यांचे व्याख्यान होणार आहे, तर दि. १२ रोजी कवी प्रवीण दवणे हे ‘वय वादळ बिजांचं’ या विषयावर बोलणार आहेत.
व्याख्यानमालेच्या तिसऱ्या व अंतिम दिवशी ज्येष्ठ पत्रकार राजा माने  (पत्रकारिता) व मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागातील वरिष्ठ वाणिज्य व्यवस्थापक सुशील गायकवाड (उत्कृष्ट प्रशासन), माजी नगरसेविका चंद्रिका चौहान (सामाजिक कार्य) यांना शिवालय पुरस्कार देऊन सन्मानित केले जाणार आहे. आमदार दिलीप माने व महापौर अलका राठोड यांच्या हस्ते व महापालिका सभागृहनेते महेश कोठे यांच्या अध्यक्षतेखाली पुरस्कार वितरित केले जाणार आहेत.