राज्यातील सत्ताधारी काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीविरोधात असलेली नाराजी लक्षात घेत विधानसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर जिल्ह्यासह उत्तर महाराष्ट्रात शिवसेना-भाजपमध्ये प्रवेश करण्यासाठी रिघ लागली आहे. लोकसभा निवडणुकीतील यशाचा फायदा विधानसभा निवडणुकीतही महायुतीला मिळू शकेल, या विश्वासाने आघाडीतील मंडळी महायुतीत प्रवेश करू लागल्याचे दिसत असले तरी यामुळे उत्तर महाराष्ट्रात शिवसेनेला काँग्रेसचे स्वरूप येते की काय, अशी भीती शिवसेना-भाजपच्या निष्ठावंतांना वाटू लागली आहे.
लोकसभा निवडणुकीत उत्तर महाराष्ट्रातील सर्व सहाही जागांवर महायुतीचे उमेदवार प्रचंड मताधिक्क्याने विजयी झाले. त्यामुळे विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीच्या गोटात उत्साहाचे वातावरण तर, आघाडीत अस्वस्थता दिसून येत आहे. लोकसभा निवडणुकीच्या निकालाची पुनरावृत्ती विधानसभा निवडणुकीत होण्याची शक्यता लक्षात घेऊन आघाडीतील अनेक जण शिवसेना-भाजपमध्ये प्रवेश करीत असून उत्तर महाराष्ट्रात नंदुरबार, धुळे, इगतपुरी, मालेगाव, नांदगाव, दिंडोरी, येवला, सिन्नर चांदवड या मतदारसंघांमध्ये अशा मंडळींची संख्या अधिक आहे. आघाडीतून शिवसेनेत प्रवेश करणाऱ्यांच्या संख्येमुळे पक्षात फुगवटा निर्माण झाल्याचे दिसत असले तरी यामुळे कित्येक वर्षांपासून शिवसेनेशी निष्ठा बाळगून असणाऱ्या मंडळींमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. शिवसेनेत काँग्रेस किंवा राष्ट्रवादीतून येणाऱ्यांचे ज्याप्रमाणे स्वागत केले जात आहे ते पाहता निष्ठांवंतापैकी किती जणांना उमेदवारी मिळेल याविषयी साशंकता व्यक्त केली जात आहे. ऐन निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर पक्षप्रवेश करून उमेदवारी मिळवून शिवसेनेच्या बळावर निवडून येणाऱ्या अनेकांनी त्यानंतर पुन्हा काँग्रेस किंवा राष्ट्रवादीला साथ दिल्याचे यापूर्वी उत्तर महाराष्ट्रातील इगतपुरी, सिन्नर, चांदवड, कळवण यांसारख्या मतदारसंघांमध्ये दिसून आले आहे. इतर पक्षांमधून कोणी शिवसेनेत उमेदवारीच्या उद्देशाने प्रवेश करणार असेल तर त्यांना उमेदवारी न देता निष्ठावंतांपैकी कोणालाही उमेदवारी मिळावी अशी शिवसैनिकांची भावना आहे.
वरिष्ठ नेत्यांच्या माध्यमातून शिवसेनेत आघाडीतील अनेक जण प्रवेश करीत असल्यामुळे शिवसैनिकांमध्ये नवे विरूध्द जुने हा वाद उफाळण्याची शक्यताही व्यक्त होत आहे.
नवीन मंडळींना जुन्या शिवसैनिकांकडून कितपत सहकार्य मिळेल याविषयी शंका उपस्थित करण्यात येत आहे. काँग्रेस किंवा राष्ट्रवादीतील मंडळींची शिवसेनेत संख्या वाढल्यास शिवसेनेचे वैशिष्टय़ेच बाजूला राहण्याची शक्यता असून शिवसेना आणि काँग्रेस, राष्ट्रवादी यांच्यात फरकच राहणार नाही, अशी प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.