वारंवार विकासकामांसाठी पाठपुरावा करूनही जिल्हा परिषदेतील सत्ताधारी व प्रशासन प्रश्न सोडवत नसल्याचा आरोप करीत जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत मंगळवारी शिवसेना आक्रमक झाली. जि. प. अध्यक्षांसमोरील मोकळ्या जागेत सदस्यांनी ठाण मांडले. अखेर प्रत्येक गटनिहाय प्रस्तावित कामे व प्रगती याचा आढावा घेण्यासाठी विशेष सभा घेण्यात येईल, असे आश्वासन अध्यक्षा नाहिदाबानो पठाण यांनी दिले.
जिल्हा परिषदेत शिवसेनेचे सदस्य आक्रमक होते, तर युवा सेनेनेही विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर विशेष समाजकल्याण अधिकारी व उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या सहसंचालकांना वेगवेगळ्या विषयांवर निवेदने दिली.
सर्वसाधारण सभा सुरू झाल्यानंतर शिवसेना सदस्यांनी मतदारसंघातील विकासकामे होत नसल्याचा आरोप केला. प्रशासन व सत्ताधारी लक्षच देत नसल्याचे सांगत मनाजी मिसाळ, दीपक राजपूत, अनिल चोरडिया यांच्यासह सर्व महिला सदस्य अध्यक्षांसमोर मोकळ्या जागेत आल्या. त्यांनी प्रशासन नीट काम करीत नसल्याचे आरोप केले. फुलंब्रीच्या गटशिक्षण अधिकाऱ्यांनी देयक मंजूर करण्यास दोन हजार रुपयांची लाच मागितल्याचा आरोप सभेत करण्यात आला. मात्र, हा आरोप खोटा असल्याचे अधिकाऱ्यांनीही उठून सांगितले. परंतु लेखी तक्रार आल्यास त्याची चौकशी करू, असे आश्वासन सदस्य सचिवांनी दिले. एकूणच विकासकामे होत नसल्याचा आरोप करण्यात आला.
युवा सेनेची दोन निवेदने
पात्रता व इच्छा असतानाही केवळ जात पडताळणी वेळेवर झाली नाही, म्हणून अभियांत्रिकी, तंत्रशिक्षण, औषधीनिर्माणसारख्या अभ्यासक्रमांना प्रवेश मिळविणे विद्यार्थ्यांसाठी अवघड होऊन बसले आहे. जात प्रमाणपत्र तातडीने मिळावे, या साठी विशेष समाजकल्याण अधिकारी आर. यू. राठोड यांनी जातीने लक्ष द्यावे. जात वैधता प्रमाणपत्राची गरज ओळखावी, दप्तरदिरंगाई टाळावी अन्यथा युवा सेना आक्रमक आंदोलन करेल, असा इशारा युवा सेनेचे जिल्हा युवा अधिकारी ऋषिकेश खैरे यांनी दिला. उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या सहसंचालकांनी जात पडताळणी प्रमाणपत्र सादर करण्यासाठी तीन महिन्यांची मुदतवाढ देण्याचा प्रस्ताव शासनदरबारी सादर करावा, अशी विनंती करण्यात आली.