गतवर्षी कोरडय़ा दुष्काळाचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांना यंदा ओल्या दुष्काळाने मेटाकुटीस आणले आहे. त्यातही महावितरणने शेतकऱ्यांचे कृषिपंपाचे कनेक्शन कापण्याचा सपाटा लावून पठाणी वसुली करीत आहे. नवीन डी.पी.साठी आर्थिक पिळवणूक करण्यात येत आहे. अजून शेतकऱ्यांच्या हातात पिकाचे पैसे आलेले नाहीत. अशा परिस्थितीत अस्मानी व सुलतानी संकटांचा सामना करतांना जगाच्या पोशिंद्याला यातना सहन कराव्या लागत आहेत.       शेतकऱ्यांच्या कृषिपंपाच्या व ओल्या दुष्काळांच्या मदतीच्या अन्य मागण्यांसाठी २१ नोव्हेंबरला जिल्हा शिवसेनेच्या वतीने चिखली रोडवरील महावितरणाच्या कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे.
जिल्हा संपर्क प्रमुख खासदार प्रतापराव जाधव यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा सकाळी ११ वाजता जनसंपर्क कार्यालय परिसरातून निघून संगम चौक, जयस्तंभ चौक, जनता चौक, कारंजा चौक मार्गे एडेड चौकातून महावितरणाच्या कार्यालयावर धडकणार आहे.
शेतकऱ्यांना ४८ तासात खराब ट्रान्सफार्मर बदलून देणे आवश्यक आहे, तसेच ८ तास मिळणारी कृषीपंपाची वीजही महावितरणाच्या अडेलतट्टू धोरणामुळे पूर्ण वेळ मिळत नाही. कधी कधी दिवसभरातून केवळ १ तासच वीज मिळते. पठाणी वसुलीने शेतकरी हैराण झाले आहे. भारनियमनाच्या विळख्यात ग्रामीण भाग आहे. त्यामुळे ग्रामीण भागात होणारे भारनियमन थांबवावे, शेतकऱ्यांकडून होणारी वीज बिलांची वसुली थांबवून ती माफ करावी, जळालेले ट्रान्सफार्मर तत्काळ बदलून द्यावे. ओला दुष्काळ जाहिर करून हेक्टरी २५ हजार रुपयेप्रमाणे मदतीचा लाभ तात्काळ द्यावा, या व अन्य मागण्यांसाठी हा मार्चा काढण्यात येणार आहे.  या मोर्चात शेतकरी बांधवांनी आपल्या जिव्हाळ्याच्या समस्यांची सोडवणूक करून घेण्यासाठी हजारोंच्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हा शिवसेनेच्या वतीने जिल्हाप्रमुख धिरज लिंगाडे, दत्ता पाटील, आमदार विजयराज शिंदे, आमदार डॉ.संजय रायमुलकर, महिला आघाडी प्रमुख सिंधुताई खेडेकर, चंदाबाई बढे, उपजिल्हाप्रमुख शांताराम जगताप, प्रतापसिंग राजपूत, डॉ. शशिकांत खेडेकर, दिलीपबापू देशमुख, अविनाश दळवी, वसंतराव भोजने, जानराव देशमुख, युवा सेनेचे अमरदिप देशमुख, व समस्त शिवसेना पदाधिकाऱ्यांनी केले आहे.