कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या करून जीवनयात्रा संपविणाऱ्या शेतकऱ्यांच्या कुटुंबियांबरोबर धुळे तालुका शिवसेनेच्यावतीने भाऊबीज सण साजरा केला जाणार आहे. या कुटुंबियांना दिलासा देण्याचा प्रयत्न या माध्यमातून केला जाणार आहे. आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या घरी जाऊन भाऊबीजेच्या दिवशी आई, पत्नी, बहीण, मुलगी यांच्याकडून औक्षण करून घेत साडीचोळीचा आहेर देऊन कुटुंबियांच्या मनात आत्मविश्वास जागविण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
आ. प्रा. शरद पाटील यांच्या संकल्पनेतून राबविल्या जाणाऱ्या या उपक्रमाचे यंदाचे हे नववे वर्ष आहे. कर्जबाजारीपणा, नापिकी, यामुळे २००५ पासून धुळे तालुक्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे सत्र सुरू झाले. आतापर्यंत सुमारे ४०० शेतकऱ्यांनी  आपली जीवनयात्रा संपविली आहे. आत्महत्येच्या प्रयत्नात गंभीर जखमी झालेल्या शेतकऱ्यांना रुग्णालयात तातडीने सेवा देऊन वाचविण्याचा प्रयत्नही सेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते करीत असतात. या माध्यमातून अनेक शेतकऱ्यांचे प्राण वाचविण्यात यश मिळाले असल्याचे माहिती शिवसेनेच्या वतीने देण्यात आली. वारंवार येणारा दुष्काळ, सिंचन क्षेत्रात वाढ न झाल्यामुळे शेतीला आलेली उतरती कळा, शेतीपूरक जोडधंद्यांचा अभाव, अनियमित वीजपुरवठा, पिकांवरील रोगराई, खते व बियाणांत होणारी फसवणूक, लग्नकार्य व उत्सवावर होणारा खर्च, कौटुंबिक कलह, शेतकऱ्यांच्या आत्महत्येसाठी अशी अनेक कारणे पूरक ठरली आहेत. गुरुवारी शिवसेना, भाजप, रिपाइं (आठवले गट) आणि शेतकरी संघटनेचे पदाधिकारी आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या घरी एकत्रितरित्या जाऊन भाऊबीज साजरी करणार आहेत.  या कार्यक्रमात आ. प्रा. शरद पाटील, जिल्हाप्रमुख अतुल सोनवणे, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष सुधीर जाधव, शेतकरी संघटनेच्या महिला आघाडीच्या संघटक ज्योत्स्ना मुंदडा, भारती माळी, रिपाइंचे संजय पगारे, आदी उपस्थित राहणार आहेत. शिरूड, विंचूर, बोरकुंड, होरपाडा, निमगुळ, बोरविहीर, धामणगांव, तरवाडे, मोराणे, कुसुंबा, गोताणे, खेडे, लोणखेडी, देऊर बु. मेहेरगांव, निमडाळे, कावठी, कुंडाणे, विश्वनाथ अजंग नंदाळे खुर्द, मुकटी, बाभुळवाडी, बोरीस, देवभाने, कापडणे, नगांव, कुंडाणे या गावातील शेतकरी कुटुंबियांना पदाधिकारी भेट देणार आहेत.