मराठवाडा विभागातील दुष्काळी स्थितीकडे लक्ष वेधण्यासाठी शिवसेनेच्या वतीने येथे ३ फेब्रुवारीला मेळावा आयोजित केला आहे. मेळाव्यात शिवसेना कार्यप्रमुख उद्धव ठाकरे नाकर्त्यां सरकारविरुद्ध रणशिंग पुकारणार असल्याचे शिवसेनेचे मराठवाडा संपर्कप्रमुख रवींद्र मिर्लेकर यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत सांगितले.
 ३ फेब्रुवारीला दुपारी १ वाजता जिल्हा क्रीडा स्टेडियमवर हा मेळावा होईल. मराठवाडा पातळीवरील या मेळाव्यात उद्धव ठाकरे दुष्काळी स्थितीवर उपाययोजना करण्यास असमर्थ ठरलेल्या सरकारसमोर समस्या मांडणार आहेत. जालना जिल्ह्य़ात अभूतपूर्व दुष्काळी स्थिती असूनही यंत्रणा हलायला तयार नाही. सरकार संवेदनशील नसल्याने मराठवाडय़ातील जनतेचे हाल होत आहेत, अशी टीका त्यांनी केली. उद्धव ठाकरे राजकीय भाष्य करून सरकारविरुद्धच्या लढाईचे रणशिंग फुंकतील, असेही मिर्लेकर यांनी सांगितले.
माजी मंत्री अर्जुन खोतकर म्हणाले की, उद्धव ठाकरे यांचा जालना दौरा जाहीर झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी दुष्काळी मराठवाडय़ास भेट देण्याच्या हालचाली सुरू केल्या. हा दौरा जाहीर झाल्यावरच उपमुख्यमंत्र्यांनी जालन्यातील स्थितीवर मंत्रालयात बैठक घेतली. सेनेच्या ताब्यात असलेल्या जिल्हा परिषदेस बाजूला ठेवून पालकमंत्री व प्रशासन वेगळ्या यंत्रणेमार्फत जिल्ह्य़ात दुष्काळी स्थितीवर नियोजन करीत आहेत, तरीही आमच्या ताब्यातील जिल्हा परिषदेमार्फत दुष्काळी स्थितीच्या पाश्र्वभूमीवर यंत्रणा राबविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. गाव तेथे पाण्याचे टँकर व मागेल त्याला रोजगार देण्याची सरकारची जबाबदारी आहे. कृषी कर्जाचे दीर्घ मुदतीत रूपांतरण करण्याऐवजी हे कर्ज संपूर्ण माफ करावे, पूर्ण वीजबिल माफ करावे, पूर्ण शेतसारा माफ करावा, फळउत्पादक, तसेच अन्य शेतकऱ्यांना अनुदान द्यावे आदी मागण्या खोतकर यांनी केल्या.
शिवसेना उपनेते लक्ष्मण वडले म्हणाले की, मराठवाडा व पश्चिम महाराष्ट्रातील दुष्काळी स्थितीवर सरकारची वागणूक सापत्नभावाची आहे. सोलापूर जिल्ह्य़ातील एकटय़ा सांगोला तालुक्यात जनावरांच्या ९३ छावण्या सरकारने सुरू केल्या आहेत. संपूर्ण गावांची पैसेवारी पन्नासच्या आत आलेल्या जालना जिल्ह्य़ात मात्र एकही छावणी सरकारने उघडली नाही. स्वयंसेवी संस्थांनी जनावरांच्या छावण्या उघडाव्यात, असे सरकार म्हणत असले तरी त्यातील अटी जाचक असल्याचे वडले यांनी स्पष्ट केले. शिवसेनेचे जिल्हा सहसंपर्कप्रमुख शिवाजी चोथे, जिल्हाप्रमुख ए. जे. बोराडे, जि. प. अध्यक्षा आशाताई भुतेकर, जिल्हा संघटक मोहन अग्रवाल, भाऊसाहेब इंगळे, विष्णू पाचफुले, बाला परदेशी, भाऊसाहेब घुगे, जगन्नाथ काकडे आदींची उपस्थिती पत्रकार परिषदेस होती.