मनसेच्या वतीने शहरातील सुशिक्षित बेरोजगारांना आकर्षित करण्यासाठी अलिकडेच मोठय़ा प्रमाणावर रोजगार मेळा घेण्यात आल्यानंतर आता उशिरा जाग आलेल्या शिवसेनेने स्टेट बँकेतील प्रोबेशनरी अधिकाऱ्यांच्या भरतीचे निमित्त साधून दोन मार्च ते १३ एप्रिल या कालावधीत शालिमार येथील शिवसेना कार्यालयात मोफत प्रशिक्षण शिबीराचे आयोजन केले आहे.
स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळवून मराठी युवक व युवतींनी उच्च पदावर काम करावे, या हेतूने शिवसेनेच्या वतीने या शिबीराचे आयोजन करण्यात आले असून दररोज सायंकाळी दोन ते तीन तास शिबीरातील वर्ग होणार आहेत. प्रशिक्षण वर्गामध्ये लागणारे सर्व साहित्य, नमुना प्रश्नपत्रिका, उत्तरपत्रिका हे सर्व शिवसेनेच्या वतीने मोफत पुरविले जाणार आहे.
प्रशिक्षणाकरिता दररोज तज्ज्ञ व अनुभवी शिक्षक तसेच दर रविवारी सकाळी १० ते पाच या वेळेत मुंबई येथील तज्ज्ञ मार्गदर्शन करणार आहेत. प्रशिक्षण वर्ग सलग ४५ दिवसांचे सर्वसमावेशक असेल. सराव परीक्षा, मुलाखत तंत्र, स्पीड मॅथ्य या विषयांसाठी मुंबई येथील वैदिक गणित तज्ज्ञांचे मार्गदर्शन लाभणार आहे. ज्या युवक व युवतींनी या परीक्षेचे अर्ज भरले असतील त्यांनी मोफत प्रशिक्षणाकरिता सुनील शेंद्रे यांच्याशी ९८२२९४३३८८ या क्रमांकावर किंवा शिवसेना जिल्हा मध्यवर्ती कार्यालय, शालिमार चौक, नाशिक, (०२५३-२५०००२५) येथे संपर्क साधावा. अधिकाधिक युवक-युवतींनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाप्रमुख विजय करंजकर, माजी जिल्हाप्रमुख दत्ता गायकवाड यांनी केले आहे.