आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या तयारीसाठी मरगळ झटकून कामाला लागलेल्या शिवसेनेने शहरात शिवसेनेचे नगरसेवक नसलेल्या प्रभागांची जबाबदारी शेजारील सेनेच्या नगरसेवकांवर टाकण्याचा निर्णय घेतला आहे.
संपर्कप्रमुख रवींद्र मिर्लेकर यांच्या अध्यक्षतेखाली व जिल्हाप्रमुख विजय करंजकर यांच्या मार्गदर्शनाखाली महानगरप्रमुख अजय बोरस्ते यांनी रविवारी प्रभाग क्रमांक ३० मध्ये नगरसेवक सचिन मराठे यांच्या कार्यालयात पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. या वेळी मराठे यांच्यावर प्रभाग क्र. २८, २९ व ३१ ची अतिरिक्त जबाबदारी सोपविण्यात आली. याप्रसंगी दत्ता गायकवाड, हेमंत गोडसे, नंदन रहाणे, नीलेश कुलकर्णी, संतोष कहार आदी उपस्थित होते. ज्या प्रभागांमध्ये शिवसेनेचे नगरसेवक नाहीत त्या प्रभागात शिवसेना पदाधिकाऱ्यांनाच नगरसेवकाची भूमिका पार पाडावी लागेल, असे मिर्लेकर यांनी सांगितले. प्रभाग ३२ चे नगरसेवक शैलेश ढगे व मंगला आढाव यांच्याकडे ३३ व ३५, प्रभाग ५१ चे नगरसेवक उत्तम दोंदे व शोभा फडोळ यांच्याकडे प्रभाग ५०, प्रभाग ४५ चे नगरसेवक डी. जी. सूर्यवंशी यांच्याकडे प्रभाग ४४ व ४८, प्रभाग ४२ च्या नगरसेविका कल्पना पांडे यांच्याकडे प्रभाग ४३ याप्रमाणे अतिरिक्त जबाबदारी व पालकत्व सोपविण्यात आले आहे.