मुद्गल बंधाऱ्यातील पाणी पाथरी व सोनपेठ तालुक्यातील शेतकऱ्यांच्या हक्काचे आहे. पाण्याचा एक थेंबही परळीच्या औष्णिक विद्युत प्रकल्पासाठी दिला जाऊ नये. पाणी पळविणाऱ्यास प्रसंगी पाण्यातच डुबवू, असा इशारा आज शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिला.
पाथरी तालुक्यातील मुद्गल येथील बंधाऱ्यात अडवलेले पाणी परळी येथील औष्णिक विद्युत प्रकल्पासाठी वापरण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. या बंधाऱ्यावर पाथरी व सोनपेठ तालुक्यातील वीसहून अधिक गावांचा पाणीपुरवठा व सिंचन क्षेत्र अवलंबून आहेत. या पाण्यावर परभणी जिल्हय़ाचा हक्क आहे, त्यामुळे परळी औष्णिक केंद्राला पाणी सोडण्यास शिवसेनेने विरोध केला आहे.
यासंदर्भात रविवारी या अनुषंगाने बंधाऱ्यावर शिवसेनेने इशारा मोर्चा काढला. मोर्चाचे नेतृत्व आमदार मीरा रेंगे, जिल्हा सहसंपर्कप्रमुख डॉ. शिवाजी दळणर, जिल्हाप्रमुख बाळासाहेब जाधव यांनी केले.
पाणी सोडण्यास येणाऱ्या अधिकाऱ्यांचे हातपाय बांधून त्यांना पाण्यात टाकून देऊ, असा इशाराही या वेळी शिवसेना पदाधिकाऱ्यांनी दिला. आमदार रेंगे, डॉ. दळणर, जाधव, कल्याण रेंगे, मुंजाजी कोल्हे आदींची या वेळी भाषणे झाली. मोर्चात उपजिल्हाप्रमुख बाळासाहेब निरपणे, तालुकाप्रमुख रवींद्र धर्मे, रावसाहेब निकम आदींसह शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्ते व शेतकरी सहभागी झाले होते.