सीबीडी पोलीस ठाण्यात एका तरुणीने वीस दिवसांपूर्वी दाखल केलेल्या बलात्कार प्रकरणात बेलापूर दिवाणी न्यायालयाने अटकपूर्व जामीन फेटाळल्याने नवी मुंबई शिवसेना जिल्हाप्रमुख विजय चौगुले यांनी गुरुवारी रात्री उशिरा आपल्या पदाचा राजीनामा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे दिला. निर्दोषत्व सिद्ध होईपर्यंत आपण एक शिवसैनिक म्हणून पक्षात काम करणार असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे. चौगुले यांनी स्वत:हून राजीनामा द्यावा म्हणून मातोश्रीवरून दबाव वाढला होता. जिल्हाप्रमुख एकनाथ शिंदे यांनी तीन दिवसांपूर्वी चौगुले यांना बोलावून तशी समज दिली होती. आता चौगुले यांच्या जागी अनेक नावांची चर्चा सुरू असून बेलापूर संपर्कप्रमुख विठ्ठल मोरे व उपशहरप्रमुख मनोहर गायखे यांची नावे आघाडीवर आहेत.
कोपरखैरणे येथील एका तरुणीने चौगुले यांच्याविरोधात बलात्कार व अपहरणाची १७ डिसेंबर रोजी तक्रार दाखल केली आहे. त्या प्रकरणात चौगुले यांनी अटकपूर्व जामीन घेतला होता. त्याची मुदत ८ जानेवारी रोजी संपली. त्यामुळे बेलापूर दिवाणी न्यायालयाने या जामिनाला मुदतवाढ देण्यास नकार दिल्याने चौगुले यांना कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता असून ते सध्या फरार आहेत. गुरुवारी हा जामीन नामंजूर झाल्याची माहिती मिळताच चौगुले यांनी आपल्या जिल्हाप्रमुख पदाचा राजीनामा मातोश्रीवर पाठवून दिला. त्या अगोदर ठाणे जिल्हाप्रमुख व पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांना राजीनामा देण्यास सुचवले होते. त्यामुळे शिवसेना नवी मुंबईत नव्या नेतृत्वाच्या शोधात अशी बातमी महामुंबई वृत्तान्तने गुरुवारी दिली होती. चौगुले यांच्या कार्यपद्धतीविषयी अनेक तक्रारी मातोश्रीवर यापूर्वी गेल्या होत्या. त्यात त्यांची शिवराळ भाषा आणि विलास जाधव खून प्रकरणाचा समावेश होता. त्यामुळे चौगुले यांना पर्याय शोधण्याचे काम गेली अनेक महिने सुरू होते, मात्र ठोस नेतृत्व नसल्याने पक्षश्रेष्ठी निर्णय घेण्यास धजावत नव्हते. त्यात त्यांना विधानसभा उमेदवारी देऊनही त्यांचा पराभव झाल्याने ही प्रक्रिया जोरात सुरू झाली होती. याच काळात नेमकी तरुणी बलात्कार प्रकरणाची पोलीस तक्रार झाली. त्यामुळे त्यांना हटविण्याशिवाय शिवसेनेला दुसरा पर्याय शिल्लक राहिला नाही. चौगुले यांच्या या प्रकरणाचा पालिका निवडणुकीत शिवसेनेला मोठा फटका बसणार असल्याचे सांगण्यात आले. शिवसेनेत काल-परवा आलेल्या एका अधिकारी नेत्याने याबाबत मातोश्रीचे चांगलेच कान भरले. त्यामुळे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिंदे यांच्या वतीने चौगले यांचा राजीनामा मागून घेतला. पालिका निवडणुका आता तीन महिन्यांवर आल्याने चांगल्या नेतृत्वाच्या शोधात शिवसेना असून यात विठ्ठल मोरे, मनोहर गायखे, एन. के. म्हात्रे, हरिभाऊ म्हात्रे, भोलानाथ तुरे, सुरेश म्हात्रे, विजय माने या पदाधिकाऱ्यांचा विचार केला जाणार आहे.