निवडणुकीचे बिगूल वाजूनदेखील राज्यात युती आणि आघाडीतील तेढ कायम असतानाचा उरण पंचायत समितीच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादीने आणि शिवसेनेने युती करत सभापती आणि उपसभापतिपदाची माळ गळ्यात पाडून घेतली. स्थानिक पातळीवर होणाऱ्या या युतीने सर्वाचे लक्ष राज्य पातळीवरील निर्णयांकडे लागले आहे. यातच लोकसभा निवडणुकीत शेकापाने सेनेशी घेतली फारकत शेकापाला महागात पडली आहे.
उरण पंचायत समितीच्या सभापतिपदासाठी सर्वसाधारण महिला पदाचे आरक्षण होते. या पदासाठी शिवसेनेच्या आदिवासी उमेदवार देवका वाघमारे तर उपसभापतिपदासाठी राष्ट्रवादीचे विजय भोईर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. शेकापच्या वतीने सभापतिपदासाठी माया पाटील व उपसभापतिपदासाठी निर्मला घरत यांनी अर्ज दाखल केला होता. उरण पंचायत समितीच्या आठ पंचायत समितींच्या सदस्यांपैकी शिवसेना-४, शेकाप-२ तर काँग्रेस व राष्ट्रवादी यांचे प्रत्येकी एक असे पक्षीय बलाबल आहे. या निवडणुकीत शिवसेना व राष्ट्रवादी यांच्यात युती झाल्याने उरण पंचायत समितीच्या सभापतिपदासाठी झालेल्या निवडणुकीत सभापती व उपसभापतिपदासाठी झालेल्या निवडणुकीत आठपैकी पाच मते सेना-राष्ट्रवादी युतीला मिळाल्याने सभापतिपदी वाघमारे आणि उपसभापती भोईर विराजमान झाले. शेकापच्या उमेदवारांना काँग्रेसच्या सदस्याने मते दिल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या. या निवडणुकीसाठी पीठासिन अधिकारी म्हणून उरणचे तहसीलदार नितीन चव्हाण यांनी काम पाहिले.