News Flash

शिवसेनेचा विरोध कायम तर, काँग्रेसचा प्रेमीजनांना पाठिंबा

‘व्हॅलेंटाईन डे’ साजरा करण्याच्या मुद्यावरून राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा राजकारण सुरू झाले असून शिवसेना वगळता कोणत्याही पक्षाने या दिवसाला विरोधाची भूमिका घेतलेली नाही. व्हॅलेंटाईन डे

| February 14, 2013 12:56 pm

‘व्हॅलेंटाईन डे’ साजरा करण्याच्या मुद्यावरून राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा राजकारण सुरू झाले असून शिवसेना वगळता कोणत्याही पक्षाने या दिवसाला विरोधाची भूमिका घेतलेली नाही. व्हॅलेंटाईन डे ला शिवसेनेने विरोधाची भूमिका कायम ठेवली असली तरी प्रेमीजनांनी अशा कोणत्याही दबावाला बळी न पडता हा दिवस उत्साहात साजरा करावा, असे आवाहन काँग्रेसने केले आहे. गरज भासल्यास प्रेमीजनांना संरक्षण देण्यासाठी काँग्रेसने आपले कार्यकर्ते रस्त्यावर उतरविण्याचे संकेत दिले असताना राष्ट्रवादी व मनसेने या दिवसाला विरोध नसल्याचे स्पष्ट केले आहे. भारतीय संस्कृतीचा अभिमान बाळगावा, असे आवाहन करत भाजपने स्पष्ट भूमिका घेण्याचे टाळले आहे. या राजकीय भूमिकांच्या पाश्र्वभूमीवर, पोलीस यंत्रणेनेही कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून खबरदारीच्या उपाययोजनांवर लक्ष केंद्रीत केले आहे.
काही वर्षांपासून व्हॅलेंटाईन डे ला शिवसेनेकडून सातत्याने विरोध केला जात असून पाश्चिमात्य संस्कृतीचे अनुकरण असल्याचा आक्षेप घेण्यात येत आहे. यंदाही सेनेच्या भूमिकेत कोणताही फरक पडलेला नाही. दोन-तीन वर्षांपासून विरोधाची धार कमी कमी होत गेली असून त्यामुळेच यंदाही केवळ इशाऱ्यापुरताच शिवसेनेचा विरोध असेल असे चित्र दिसत आहे. व्हॅलेंटाईन डे सारख्या दिवसामुळे संस्कृती बिघडते, याकडे सेनेचे जिल्हाप्रमुख विजय करंजकर यांनी लक्ष वेधले. शिवसेना वगळता मनसे, काँग्रेस, राष्ट्रवादी आणि संस्कृती रक्षणाचा टेंभा मिरविणाऱ्या भाजपनेही या दिवसाला विरोध न करण्याची भूमिका घेतली आहे. मनसेने या दिवसाला कधीही विरोध केला नसल्याचे शहराध्यक्ष आ. नितीन भोसले यांनी सांगितले. परंतु, हा दिवस साजरा करताना प्रेमीजनांकडून गैरप्रकार होणार असतील तर ते खपवून घेतले जाणार नाहीत, असा इशाराही त्यांनी दिला. शिवसेनेच्या विरोधाला न जुमानता हा दिवस साजरा करावा, असे आवाहन काँग्रेसचे शहराध्यक्ष आकाश छाजेड यांनी केले आहे. प्रेमीजनांमध्ये शिवसेनेच्या विरोधामुळे दहशतीचे वातावरण असल्यास काँग्रेसचे कार्यकर्ते त्यांना संरक्षण देतील, असेही छाजेड यांनी म्हटले आहे. या दिवसाला राष्ट्रवादी काँग्रेसचा विरोध नसून शिवसेनेचा ‘व्हॅलेंटाईन डे’कडे पाहण्याच्या दृष्टिकोन वेगळा असल्याचे शहराध्यक्ष शरद कोशिरे यांनी नमूद केले. सर्व राजकीय पक्षांनी स्पष्ट भूमिका घेतली असताना भाजपने ‘नरो वा कुंजरोवा’ असे धोरण स्वीकारले आहे. तरूणांनी भारतीय संस्कृतीचा अभिमान बाळगावा, असे आवाहन भाजपचे शहराध्यक्ष लक्ष्मण सावजी यांनी केले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 14, 2013 12:56 pm

Web Title: shivsena opposed is continues but congress supports to lovers
टॅग : Lovers,Valentine Day
Next Stories
1 ‘आपत्ती व्यवस्थापन’ व्यंगचित्र प्रदर्शनास प्रतिसाद
2 कायदा व सुव्यवस्था राखण्यात हातभार
3 प्रेमीजनांमध्ये ‘व्हॅलेंटाइन डे’चा ज्वर
Just Now!
X