23 November 2017

News Flash

‘मातोश्री’ने मागविले नगरसेवकांचे प्रगतीपुस्तक

गेल्या वर्षभरात नगरसेवकांनी केलेल्या कामाचा आढावा घेण्यासाठी त्यांची प्रगतिपुस्तके ‘मातोश्री’वर धाडण्याचे फर्मान शिवसेना अध्यक्ष

प्रसाद रावकर, मुंबई | Updated: January 25, 2013 12:12 PM

गेल्या वर्षभरात नगरसेवकांनी केलेल्या कामाचा आढावा घेण्यासाठी त्यांची प्रगतिपुस्तके ‘मातोश्री’वर धाडण्याचे फर्मान शिवसेना अध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी महापौरांना सोडले आहे.
शिवसेनाप्रमुखांच्या निधनानंतर आलेली मरगळ झटकून शिवसेना सज्ज होऊ लागली असून गेल्या वर्षभरातील कारभाराचा आढावा घेण्यासाठी नगरसेवकांची प्रगतिपुस्तके  मातोश्रीवर मागविण्यात आली आहेत. तसेच नगरसेवकांवर बारकाईने लक्ष ठेवण्यासाठी पालिकेच्या प्रतोदपदी लवकरच दोघांची नियुक्ती करण्यात येणार आहे.
गेल्या वर्षभरात नवनिर्वाचित नगरसेवकांनी आपल्या प्रभागांमध्ये काय कामे केली, पालिकेच्या किती बैठकांना ते उपस्थित होते, किती नागरी प्रश्नांना त्यांनी वाचा फोडली, नागरी समस्या सोडविण्यासाठी कोणते प्रयत्न केले याचा लेखाजोखा उद्धव ठाकरे यांनी महापौर सुनील प्रभू यांच्याकडे मागितला आहे. पालिकेच्या चिटणीस विभागाकडे उपलब्ध असलेली माहिती युद्धपातळीवर ‘मातोश्री’वर पाठविण्यात येत आहे. परिणामी पालिका सभागृह, स्थायी समिती आणि अन्य वैधानिक समित्यांमध्ये मूग गिळून बसणाऱ्या नगरसेवकांना कापरे भरले आहे. आपल्याला मिळालेले समितीचे सदस्यत्व गमवावे लागू नये यासाठी त्यांनी नेते मंडळींची मनधरणी करायला सुरुवात केली आहे.
पालिकेच्या वैधानिक आणि प्रभाग समित्यांच्या निवडणुका मार्च महिन्यात होऊ घातल्या आहेत. एखाद्या समितीच्या अध्यक्षपदाची माळ आपल्या गळ्यात पडावी यासाठी अनेक नगरसेवक-नगरसेविका उत्सुक आहेत. परंतु उद्धव ठाकरे यांनी प्रगतिपुस्तक मागविल्याने सर्वच धास्तावले आहेत.
पालिकेतील कारभारावर आणि नगरसेवकांवर बारीक लक्ष ठेवण्यासाठी, तसेच ‘मातोश्री’ आणि नगरसेवकांमध्ये समन्वयक राखण्यासाठी पालिकेत प्रतोद नेमण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याची कुणकुण लागल्यामुळे काही नेत्यांना प्रतोदपदाची स्वप्ने पडू लागली आहेत, तर नगरसेवकांमध्ये कमालीची अस्वस्थता पसरली आहे. हे प्रतोद पालिकेत नेमके काय करणार, असा प्रश्न नगरसेवकांना पडला आहे. प्रतोदपदासाठी माजी महापौर विशाखा राऊत, तसेच मनसेतून शिवसेनेत दाखल होताच निवडणूक लढवून पालिकेत दाखल झालेल्या नगरसेविका शीतल म्हात्रे यांची नियुक्ती करण्यावर जवळजवळ शिक्कामोर्तब झाले आहे. मात्र या दोघींचीही नियुक्ती होऊ नये यासाठी स्थानिक पातळीवरील त्यांचे प्रतिस्पर्धी जोरदार मोर्चेबांधणी करू लागले आहेत.

First Published on January 25, 2013 12:12 pm

Web Title: shivsena president called progress report of corporator