शिवसेना नेते वामनराव महाडिक यांची स्मृती जपण्यासाठी शिवडीमधील क्षयरोग रुग्णालयाला जमीन आणि मोठी देणगी देणाऱ्या दानशूराचे नाव पुसून टाकण्याचा घाट सत्ताधारी शिवसेनेने विरोधकांशी हातमिळवणी करून घातला आहे.
मुंबईमध्ये क्षयरुग्णांसाठी रुग्णालय उभारण्याचा विचार महापालिका १९३९-४० च्या सुमारास करत होती. त्यावेळी  समाजसेवक माणिकलाल प्रेमचंद्र यांनी शिवडी येथे जमीन आणि दीड लाख रुपये महापालिकेला देणगी दिले. हे दीड लाख ७५ वर्षांपूर्वी दिले होते हे महत्त्वाचे. त्यामुळे महापालिकेला हे रुग्णालय उभारणे शक्य झाले. माणिकलाल प्रेमचंद्र यांच्या आग्रहानुसार या रुग्णालयाचे नामकरण ‘रमेश प्रेमचंद्र क्षयरोग रुग्णालय’ असे करण्यात आले. आजही हे रुग्णालय त्याच नावाने ओळखले जाते.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे निकटवर्ती म्हणून ओळखले जाणारे आणि महापौर, आमदार, खासदार असा राजकीय प्रवास करीत सर्वसामान्यांमध्ये मानाचे स्थान मिळवणारे वामनराव महाडिक यांच्या स्मृती जपण्यासाठी शिवसेनेची आता धडपड सुरू आहे. यासाठी ‘रमेश प्रेमचंद्र क्षयरोग रुग्णालय समूहा’चे नाव बदलून त्यास वामनराव महाडिक यांचे नाव देण्याचे सध्या घाटत आहे. शिवसेना नगरसेवक संजय (नाना) आंबोले आणि सुनील मोरे यांनी या रुग्णालयाला वामनराव महाडिक यांचे नाव देण्यात यावे, अशी मागणी करणारे पत्र प्रशासनाला पाठविले होते. त्याचा आधार घेत प्रशासनाने या रुग्णालयाचे ‘प्रिन्सिपल कै. वामनराव महाडिक क्षयरोग रुग्णालय’ असे नामकरण करण्याचा प्रस्ताव अलीकडेच पार पडलेल्या आरोग्य समितीच्या बैठकीत सादर केला होता. सत्ताधारी आणि विरोधी पक्षाच्या नगरसेवकांनी एकमताने तो मंजूर केला.
विद्यमान रस्त्यांना अथवा अन्य ठिकोणांना देण्यात आलेली भारतीय व्यक्तींची नावे अपवादात्मक परिस्थितीखेरीज बदलू नयेत, असे महापालिकेच्या नियमांत स्पष्ट म्हटले आहे. तसेच, नियमानुसार परकीय व्यक्तिचे रस्त्याला अथवा अन्य ठिकाणाला दिलेले नाव बदलण्याचा प्रस्ताव विचारात घेता येतो. मात्र, असे असतानाही क्षयरोग रूग्णालयासाठी जमीन आणि देणगी देणाऱ्या व्यक्तिचेच नाव पुसण्याचा प्रकार घाट शिवसेना विरोधकांच्या मदतीने घालत आहे. लवकरच हा प्रस्ताव पालिका सभागृहात मंजूरीसाठी सादर होणार आहे. त्यामुळे पालिका वर्तुळात प्रचंड चीड व्यक्त होत आहे.