पंचगंगा नदीमध्ये मैलायुक्त सांडपाणी उघडपणे सोडले जात असल्याच्या प्रकाराचा जाब विचारीत बुधवारी शिवसैनिकांनी प्रदूषण नियंत्रण मंडळ कार्यालयात गोंधळ घातला. मैलायुक्त सांडपाणी सोडणारा टँकर पकडून त्याची मोडतोड करण्यात आली. शिवसैनिकांनी प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांना जिल्हाधिकारी कार्यालयात नेले. निवासी जिल्हाधिकारी संजय पवार यांनी टँकर जप्त करण्याचा व महापालिकेवर फौजदारी दावा दाखल करण्याचा आदेश दिला.
पंचगंगा नदीच्या प्रदूषणामध्ये वाढ होऊ लागली आहे. कोल्हापूर महापालिकेचे सांडपाणी पंचगंगा नदीमध्ये सोडले जात असल्याने नागरिकांतून संताप व्यक्त केला जात आहे. याबाबत आज शिवसेनेचे जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव, महादेव गौड, सयाजी चव्हाण, संभाजी पाटील, मलकारी लवटे, इचलकरंजीचे शहरप्रमुख धनाजी मोरे, शिरोळ तालुका प्रमुख सतीश मलमे, हातकणंगले तालुका प्रमुख बाजीराव पाटील, साताप्पा भवान यांच्यासह शिवसैनिक प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कार्यालयात पोहोचले. मंडळाचे अधिकारी डोके, दुर्गुळे यांना पंचगंगा नदी प्रदूषण होत असताना प्रदूषण नियंत्रण मंडळ काय करीत आहे, अशी विचारणा करीत धारेवर धरले. अधिकाऱ्यांना दुरुत्तरे मिळू लागल्याने शिवसैनिक आक्रमक झाले. त्यांनी कार्यालयात घोषणाबाजी सुरू केली.     
या वेळी शिवसैनिकांनी पंचगंगा नदीत मैलायुक्त सांडपाणी सोडले जात असल्याचे नमूद केले. मात्र अधिकाऱ्यांनी त्याचा इन्कार केला. त्यावर शिवसैनिकांनी अधिकाऱ्यांना सोबत घेऊन नदीमध्ये सांडपाणी सोडत असलेल्या ठिकाणी घेऊन गेले. नदीत उघडपणे मैलायुक्त सांडपाणी मिळसत असल्याचे पाहून आंदोलक संतप्त झाले. त्यांनी टँकरची नासधूस केली. टँकरच्या सर्व काचा दगड मारून फोडल्या, टँकरची हवा सोडून देण्यात आली.     या प्रकारानंतर शिवसैनिक अधिकाऱ्यांसह जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचले. निवासी जिल्हाधिकारी संजय पवार यांनी पंचगंगा नदीचे प्रदूषण कसे उघडपणे सुरू आहे, याची सविस्तर माहिती दिली. पवार यांनी नदीत मैलायुक्त पाणी सोडणारा टँकर जप्त करण्याचा आदेश दिला. या प्रकरणी महापालिकेवर फौजदारी गुन्हा दाखल करावा, असा आदेश प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांना दिला. महापालिकेचे जलअभियंता मनीष पवार हे या वेळी उपस्थित होते. त्यांना असा प्रकार झाल्यास दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागेल, असा इशारा देण्यात आला.    
या आंदोलनानंतर पत्रकारांशी बोलताना जिल्हाप्रमुख जाधव म्हणाले, निवासी जिल्हाधिकाऱ्यांनी पंचगंगा नदीचे प्रदूषण पंधरा दिवसांत थांबविण्याचे मान्य केले आहे. या अवधीत प्रदूषण कमी झाले नाही तर शिवसेना स्टाईलने अधिकाऱ्यांना धडा शिकविला जाईल. उन्हाळ्यामध्ये जिल्ह्य़ात काविळीचे ३० बळी जाऊनही नदीच्या प्रदूषण प्रश्नी प्रशासन निष्क्रिय असल्याने शिवसेना आक्रमक भूमिका घेणार आहे.