लोकसभा निवडणुकीतील निकालाबाबत अनिश्चितता वाटत असल्यानेच ‘सावध खेळी’ म्हणून स्थायी समिती अध्यक्षपदी घट्ट चिकटून राहण्याची भूमिका विद्यमान स्थायी समिती अध्यक्ष राहुल शेवाळे यांनी घेतल्याची चर्चा असून, त्यामुळे शिवसेनेत नाराजी पसरली आहे. तर विरोधी पक्षांनी टीकेची संधी न सोडता शेवाळे यांना निकालाची ‘भीती’ वाटत आहे की काय, असा सवाल केला आहे.
शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशी यांना डावलून दक्षिण मध्य मुंबईतून लोकसभेची उमेदवारी मिळविल्यानंतरही स्थायी समिती अध्यक्षपदी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आशीर्वादाने राहुल शेवाळे चिकटून आहेत. शेवाळे यांना सलग पाचव्यांदा स्थायी समिती अध्यक्षपद देण्याचा निर्णय शिवसेना पक्षप्रमुखांनी घेतल्यामुळे पालिकेतील शिवसेना नगरसेवकांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे.
शेवाळे यांनी अशी कोणती ‘अर्थपूर्ण’ जादू उद्धव यांच्यावर केली आहे, ज्यामुळे त्यांना लोकसभेची उमेदवारी तसेच स्थायी समितीचे चिरस्थायी अध्यक्षपद देण्यात येते, असा सवाल दबक्या आवाजात सेनेच्या नगरसेवकांकडून विचारण्यात येत आहे.
मनसेचे गटनेते संदीप देशपांडे यांच्या म्हणण्यानुसार राहुल शेवाळे यांच्या गेल्या चार वर्षांच्या कार्यकाळात स्टँडिंग कमिटी ही पूर्णपणे ‘अंडरस्ँटडिंग कमिटी’ बनली असून, शिवसेनेच्या सदस्यांनाही आवाज उठवता येत नव्हता. गेल्या चार वर्षांच्या कालावधीत स्थायी समितीत जो अर्थसंकल्प मंजूर झाला त्यातील निम्माही भांडवली खर्च सेना-भाजपला खर्च करता आलेला नाही.
एकीकडे रस्त्यांचे कोटय़वधी रुपयांचे प्रस्ताव मंजूर करून घ्यायचे आणि दुसरीकडे रिलायन्सला ४-जीसाठी रस्ते खोदायला साह्य़ करायचे, यामुळे आगामी काळात मुंबईतील रस्त्यांची पुरती वाट लागलेली दिसून येईल. पालिका अधिनियम १८८८ नुसार मंजूर झालेल्या अर्थसंकल्पातील खर्चाचा हिशेब दरमहा स्थायी समितीत सादर करणे हे आयुक्तांना बंधनकारक असतानाही, शेवाळे यांनी असा हिशेब मागण्याची हिंमत एकदाही दाखवलेली नाही. परिणामी प्रशासनाकडून स्थायी समितीला गेल्या चार वर्षांत एकदाही नियमित हिशेब सादर करण्यात आलेला नाही.
मंत्री असल्याच्या थाटात शेवाळे यांनी स्थायी समितीत अनेकदा प्रशासनाला वेगवेगळे अहवाल तसेच श्वेतपत्रिका सादर करण्याचे आदेश दिले होते. यातील एकाही आदेशाचे प्रशासनाने पालन केलेले नाही, यातच त्यांचे ‘कर्तृत्व’ सिद्ध होते. गेली अनेक वर्षे भांडवली कामांसाठीच्या कोटय़वधी रुपयांच्या तरतुदींपैकी निम्मीही रक्कम प्रशासनाक डून खर्च होत नसताना शेवाळे आणि मंडळी का गप्प बसली, असा सवालही देशपांडे यांनी केला.
तर शेवाळेंना हटवून नवीन व्यक्तीची नियुक्ती केली तरच मुंबईकरांना काही सुविधा मिळू शकतील, असे पालिकेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र आंबेकर यांनी सांगितले.
पराभवाच्या भीतीने शेवाळे अशी खेळी करत आहेत  -संदीप देशपांडे, मनसेचे गटनेते
महापालिकेत शिवसेनेकडे अन्य कोणी लायक नगरसेवक नाही का? -देवेंद्र आंबेकर, विरोधी पक्षनेते