कृषिधन बियाणे कंपनीने कापूस उत्पादक शेतकऱ्यांना निर्धारित करारानुसार कापूस खरेदीचा मोबदला दिला नाही. कंपनीने कमी मोबदला देऊन शेतकऱ्यांची फसवणूक चालविली आहे. कृषिधनने ठरल्यानुसार संपूर्ण मोबदला न दिल्यास शिवसेनेच्यावतीने कंपनीविरोधात आंदोलन छेडण्याचा इशारा शिवसेनेचे देऊळगावराजा तालुकाप्रमख दादाराव खार्डे यांनी दिला आहे.
कृषिधन कंपनीने गतवर्षीच्या खरीप हंगामात परिसरातील शेकडो शेतकऱ्यांना कापूस बियाणे उत्पादनाचा कार्यक्रम दिला होता. बियाणे वाटप करतांनाच कंपनीने वीस हजार रुपये प्रती क्विंटल दराने कापूस खरेदी करण्याची हमी दिली होती. ठरल्याप्रमाणे कंपनीने शेतकऱ्यांकडून कापूस खरेदी केला. मात्र, त्याचा मोबदला देतांना शेतकऱ्यांच्या हातात प्रती क्विंटल पंधरा हजार असाच दर दिला. ही शेतकऱ्यांची शुध्द फसवणूक आहे. उर्वरित पाच हजार रुपये फरकाची रक्कम त्वरित द्यावी अन्यथा, शिवसेना रस्त्यावर उतरेल, असा इशारा खार्डे यांनी दिला आहे.
कृषिधन कंपनीने शेतकऱ्यांशी करार करतांना वेळेवर कापूस खरेदी करण्यात येईल, वीस हजार रुपये प्रती क्विंटल दराने खरेदी करण्यात येईल, मे २०१३ पर्यंत कापूस खरेदीचा संपूर्ण मोबदला देण्यात येईल, असे अभिवचन दिले होते. मात्र, कंपनीकडून ते पाळण्यात आले नाही. कंपनीने कापूस खरेदीत विलंब लावला. कापूस खरेदी करतांना निर्धारित केलेल्या दराप्रमाणे मोबदला न देता पंधरा हजार रुपये प्रती क्विंटल दराने मोबदला दिला. हा मोबदला देतांना मे ऐवजी ऑगस्ट उजाडला. त्यामुळे शेतकऱ्यांना पेरणीत ही रक्कम उपयोगी पडली नाही, असा आरोप शिवसेनेचे दादाराव खार्डे, गजानन घुगे, अविनाश डोईफोडे, प्रल्हाद शिंगणे, प्रल्हाद काकड यांनी केला आहे. या फसवणुकीविरोधात शिवसेना तीव्र आंदोलन करेल, असा इशारा त्यांनी दिला आहे. येत्या आठ तारखेनंतर हे आंदोलन छेडले जाईल, असे त्यांनी निवेदनात नमूद केले.