उरण विधानसभेची निवडणूक जिंकल्याने शिवसेनेची उरण तालुक्यावर एकहाती सत्ता झाली आहे. यामध्ये शिवसेनेकडे तालुक्याचे आमदार, उरण पंचायत समितीच्या सभापतिपदी शिवसेना, उरण नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदी शिवसेना अशा सर्वच ठिकाणी शिवसेनेने एकहाती सत्ता काबीज केली आहे. त्यामुळे आता उरण तालुका हा शिवसेनेचा गड बनला आहे. काही ग्रामपंचायती व नगरपालिकेपुरता मर्यादित असलेल्या शिवसेनेला मागील अनेक निवडणुकांत शेकापच्या साथीने उरण पंचायत समिती तसेच जिल्हा परिषदेच्या सत्तेतील वाटेकरी होण्याची संधी मिळाली. शिवसेना, भाजपा व शेकाप युतीची सत्ता उरण नगरपालिकेवर आहे. पंचायत समितीत असलेली शिवसेना शेकापची युती तुटल्याने शिवसेनेने राष्ट्रवादीबरोबर घरोबा करून आपली सत्ता कायम ठेवली आहे. रविवारच्या उरण विधानसभा निवडणुकीनंतर आता उरण विधानसभेचा आमदारही शिवसेनेचाच निवडून आल्याने शिवसेना उरण तालुक्यातील सर्वच सत्तास्थानी असल्याचे चित्र आहे.