येथील भारतीय संस्कृती सेवा प्रतिष्ठानच्या वतीने दिल्या जाणाऱ्या ‘स्व. पं. मदनगोपाल व्यास पुरस्कार’साठी यंदा शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांची निवड करण्यात आली आहे. रविवारी (दि. १७) सकाळी ९.३० वाजता यशवंतराव सहकार सभागृहात या पुरस्काराचे वितरण होणार आहे. संस्थेचे सचिव अरुण झंवर यांनी ही माहिती दिली.
समारंभास भाजपचे राष्ट्रीय सचिव शामसुंदर जाजू, विरोधी पक्ष नेते एकनाथ खडसे, खासदार दिलिप गांधी, आ. अनिल राठोड व अरुण जगताप, महापौर शिला शिंदे, उपमहापौर गीतांजली काळे, पोलीस अधीक्षक रावसाहेब शिंदे आदी उपस्थित राहतील. पुरस्काराचे हे पाचवे वर्ष आहे. २५ हजार रु. रोख, शाल, श्रीफळ व सन्मानपत्र असे पुरस्काराचे स्वरुप आहे. स्व. पं. व्यास व त्यांचे पुत्र राष्ट्रसंत रमाकांत व्यास यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून हा सोहळा होईल.
कांचीपीठाचे शंकराचार्य जयेंद्र सरस्वती यांच्या उपस्थितीत १९९८ मध्ये प्रतिष्ठानची स्थापना झाली. स्व. व्यास यांचा वेदांत व ज्योतिष शास्त्राचा गाढा अभ्यास होता. त्यांनी १०८ वेळा शुक्ल यजुर्वेद पारायण केले. वडिलांच्या इच्छेला मान देऊन रमाकांत यांनी मुंबई उच्च न्यायालयातील वकिली व्यवसाय सोडून आध्यात्मिक क्षेत्रात प्रवेश केला. देश, परदेशात तीनशेहून अधिक भागवत कथा ज्ञान सोहळ्यातून श्रीकृष्ण भक्तीचा प्रसार केला. दोघांनीही गरजूंना मदत करण्याचे व्रत निष्ठेने संभाळले. सोहळ्यास उपस्थित राहण्याचे आवाहन संस्थेचे विश्वस्त योगेश्वर व्यास, प्रा, मधुसुदन मुळे आदींनी केले.