हिंदवी स्वराज्याचे संस्थापक व महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त शहरातील विविध भागात कार्यक्रम आयोजित करून त्यांना आदरांजली अर्पण करण्यात आली. मराठा विद्या प्रसारक समाज आणि नागरिक कृती समितीच्या संयुक्त विद्यमाने शोभायात्रा काढण्यात आली. या शोभायात्रेमध्ये शिवाजी महाराजांच्या जीवनावरील विविध चित्ररथ, लोकनृत्य होते. यावेळी श्रीमंत राजे मुधोजी भोसले, नगरसेविका हर्षदा साबळे, मनोज साबळे, गिरीश पांडव उपस्थित होते.
शोभायात्रा जुनी शुक्रवारी, झेंडा चौक, महाल, नरसिंग चित्रपटगृह, शिवाजी महाराज चौक, गांधी गेट, फवारा चौक, नवी शुक्रवारी, सिमेंट रोड, काशीबाई देऊळ, अशोक चौक, सोमवारी क्वार्टर, गजानन चौक, छोटा ताजबाग मार्गे सक्करदरा चौकात शोभायात्रेचा समारोप झाला.
महापालिकेतर्फे महापौर अनिल सोले, उपमहापौर संदीप जाधव, स्थायी समिती अध्यक्ष दयाशंकर तिवारी यांनी महालातील गांधी गेटसमोरील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून अभिवादन केले. याप्रसंगी आमदार कृष्णा खोपडे, आमदार विकास कुंभारे, सत्तापक्ष नेता प्रवीण दटके, माजी महापौर अर्चना डेहनकर, नगरसेवक राजेश घोडपागे, बंडू राऊत, हर्षला साबळे, प्रा. संजय भेंडे आदी उपस्थित होते.
राजा शिव छत्रपती प्रतिष्ठानतर्फे जयंती साजरी करण्यात आली. महालातील गांधी गेट येथे झालेल्या कार्यक्रमात अभय ठाकरे स्मृती ‘गजर’ हा पारंपरिक वाद्य सादरीकरणाचा कार्यक्रम पार पडला. शिवजयंतीनिमित्त १५० लोकांनी नेत्रदानाचा संकल्प केला. तसेच विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या मंडळींचा प्रतिष्ठानच्या वतीने सत्कार करण्यात आला. खासदार विलास मुत्तेमवार यांच्या हस्ते झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्रीमंत राजे मुधोजी भोसले होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून आमदार दीनानाथ पडोळे, मनपाचे सत्तापक्ष नेते प्रवीण दटके, डॉ. विकास महात्मे, जयप्रकाश गुप्ता उपस्थित होते.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे मनसेचे विदर्भ विभागीय संघटक हेमंत गडकरी यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी जिल्हा संघटक प्रवीण बरडे, जिल्हा अध्यक्ष किशोर सरायकर, शहर उपाध्यक्ष सुनील मानेकर आदींसह मनसेचे अनेक कार्यकर्ते हजर होते. भारतीय बोल्शेविक पार्टीतर्फे डॉ. शशिकांत वाईकर यांच्या अध्यक्षतेखाली पुतळ्याला पुष्पांजली अर्पण करण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे शहराध्यक्ष अजय पाटील विजय तालेवार यांनी तर बहुजन समाजपक्षातर्फे प्रदेश उपाध्यक्ष कृष्णा बेले, विश्वास राऊत यांच्यासह इतरही पदाधिकाऱ्यांनी शिवाजी महाराजांच्या पुतळ्या माल्यार्पण करून अभिवादन केले.
First Published on February 20, 2013 3:50 am